कोरोना व्हायरस संकट आणि लॉकडाऊनमुळे लांबलेला ISCE/ISC बोर्डाचा निकाल आज (10 जुलै) अखेर जाहीर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी-पालकांची प्रदिर्घ काळापासून सुरु असलेली प्रतिक्षा आज संपणार आहे. शैक्षणिक वर्ष 2019-2020 च्या ISCE/ISC बोर्डाचे निकाल आज दुपारी 3 वाजता जाहीर होणार असून यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Eeducation Minister Varsha Gaikwad) यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विट करत दिलेल्या संदेशातून वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढवले आहे.
"आज दुपारी 3 वाजता ISCE/ISC बोर्डाचा निकाल जाहीर होणार असून या सर्व विद्यार्थ्यांना आमच्याकडून शुभेच्छा आणि आशीर्वाद. तुमचा निकाल जो काही लागेल तो तुमच्यासाठी बेस्ट असेल, हे लक्षात ठेवा. तुम्हा सर्वांचे भविष्य उज्ज्वल आहे. तुमच्यामुळेच देशाची प्रगती आणि संपन्नता आकार घेण्यास मदत होणार आहे," अशा आशयाचे ट्विट शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी केले आहे.
Varsha Gaikwad Tweet:
We extend our best wishes & blessings to all the ISCE/ISC students for your exam results scheduled to be announced tomorrow at 3pm. Do remember that your result is the best result for you and you all have a bright future in shaping up our nations growth and prosperity.
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) July 9, 2020
यंदा 2.5 लाखांहून अधिक विद्यार्थी ICSE म्हणजेच 10 वीच्या आणि ISC म्हणजेच 12 वीच्या परीक्षेला बसले होते. या बोर्डाच्या परीक्षांचे कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे लांबलेले निकाल CISCE आज जाहीर करेल. त्यामुळे ISCE/ISC बोर्डाचे विद्यार्थी आणि पालकही अधिकच अधीर झाले आहेत. दरम्यान हा निकाल विद्यार्थ्यांना https://www.cisce.org/ या बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल.