महाराष्ट्रातील कोरोना विषाणूची (Coronavirus) परिस्थिती, लॉकडाऊन (Lockdown), निर्बंध, सरकार करत असलेल्या उपाययोजना याबाबत माहिती देण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊनबाबतचे निर्बंध 15 जूनपर्यंत वाढवण्यात आले असल्याचे सांगितले. शहरामधील रुग्णसंख्या कमी होत असून, ग्रामीण भागामध्ये ती किंचित वाढत असल्याचेही ते म्हणाले. राज्यातील विविध पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून, 15 जून सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत.
ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तर तिथे खालीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात येतील.
-
- सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरु ठेवता येतील.
- सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील तसेच शनिवार, रविवार ती बंद राहतील
- अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील
- दुपारी 3 नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील
- कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही 25 टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल तर संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्यास परवानगी देईल.
- कृषिविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी 2 पर्यंत सुरु राहू शकतील. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवू शकते किंवा शनिवार, रविवार सुरु ठेवण्यास परवानगी देऊ शकते.
🚨Restrictions in different parts of the state till 15th June 2021 to #BreakTheChain of transmission effectively🚨 pic.twitter.com/mRzxTlZ42n
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 30, 2021
ज्या पालिका किंवा जिल्ह्यांत पॉझिटीव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 75 टक्क्यांपेक्षा जास्त भरले असतील तर तिथे निर्बंध खालीलप्रमाणे वाढविण्यात येतील.
- अशा जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात येतील आणि कुणाही व्यक्तीला जिल्ह्याच्या आत बाहेर करण्यास परवानगी राहणार नाही.
- केवळ कुटुंबातील मृत्यू, वैद्यकीय कारण आणि आवश्यक, आणीबाणीच्या कोविड प्रसंगीची सेवा देणाऱ्या व्यक्तींचा अपवाद असेल.
- उपरोक्त प्रशासकीय घटकांमध्ये न येणाऱ्या इतर सर्व जिल्हे व पालिकांच्या ठिकाणी 12 मे 2021 चे ब्रेक दि चेनचे निर्बंध नेहमीप्रमाणे लागू राहतील. (हेही वाचा: राज्यातील लॉकडाऊन 15 जूनपर्यंत वाढवला, जिल्ह्यांमधील परिस्थितीनुसार निर्बंध कमी जास्त केले जातील- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)
दरम्यान, दुकानांना पुरवठा केल्या जाणारा वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येते. मात्र दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास दुकान कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल तसेच 12 मे च्या आदेशाप्रमाणे दंडही आकारण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार होम डिलिव्हरी सुरूच राहतील.