Nana Patole | (Photo Credits: X)

Maharashtra Congress New Chief: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांत अनेक घडामोडी घडल्या आहेत. आता पुढे काय घडणार आहे हे सांगणे मोठ्या दिग्गजांच्याही हातात नाही. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा (Congress) दारूण पराभव झाल्यानंतर पक्षात मंथन सुरू आहे. अशात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पदाच्या राजीनाम्याची भाषा केली होती. पटोले यांनी शुक्रवारी सांगितले की त्यांनी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला आपल्याला पदावरून मुक्त करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे पक्षाच्या प्रदेश युनिटला लवकरच नवा अध्यक्ष मिळणार आहे.

नाना पटोले हे गेली चार वर्षे प्रदेशाध्यक्ष आहेत-

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असलेल्या नागपूर येथील विधान भवन संकुलात पटोले पत्रकारांशी बोलत होते. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. नव्या नेत्याच्या नावाची घोषणा करण्यासाठी आम्ही पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला सुचना केली आहे.  गेल्या चार वर्षांपासून नाना पटोले या पदावर आहेत आणि आता या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी त्यांनी पक्षाच्या उच्चाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.

यापूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाल्यानंतर पटोले यांनी केंद्रीय नेतृत्वाला आपल्याला पायउतार व्हायचे असल्याचे सांगितल्याचे वृत्त होते. मात्र, आपण राजीनामा दिला नसून या अफवा पसरवल्या जात असल्याचे पटोले यांनी गेल्या आठवड्यात स्पष्ट केले होते. मात्र आता काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नव्या नेत्याचे नाव लवकरच जाहीर केले जाईल, असे ते म्हणाले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने दणदणीत विजय मिळवला आणि 288 पैकी 230 जागा जिंकल्या, तर विरोधी महाविकास आघाडीला दणदणीत पराभव पत्करावा लागला. काँग्रेसला केवळ 16 जागा मिळाल्या. साकोलीतून पटोले यांनी अवघ्या 208 मतांनी विजय मिळवला. (हेही वाचा: भाजप सत्तेत आल्यापासून मराठी भाषिक लोकांवर हल्ले वाढले, कल्याण ही सुरुवात आहे; Sanjay Raut यांचे खळबळजनक वक्तव्य)

दरम्यान, राज्यपालांच्या संयुक्त अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना, खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी असलेल्या विविध संघटना राज्य आणि लोकशाहीच्या विरोधात काम करत असून, शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. याला विरोध करत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. भारत जोडो यात्रेत सहभागी असलेल्या शहरी नक्षलवादी संघटना आणि त्या संघटनांच्या प्रमुखांची यादी देण्याची मागणी त्यांनी फडणवीस यांच्याकडे केली आहे.