काँग्रेस पक्षाने नाना पटोले (Nana Patole ) यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष (Congress State President) पदावर निवड केली. पटोले यांच्यासोबत काँग्रेस हायकमांडने आणखी सहा कार्यकारीणीत कार्यकारी अध्यक्ष नियुक्ती केले आहे. यात शिवाजीराव मोघे (Shivajirao Moghe), बसवराज पाटील (Basavaraj Patil), मोहम्मद आरिफ नसीम खान (Mohammad Arif Naseem Khan), कुणाल पाटील (Kunal Patil), चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore), प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांचा समावेश आहे. कार्यकारी अध्यक्षांच्या रुपात काँग्रेसने संघटनात्मक फेरबदल तर केलेच आहेत. परंतू, त्यासोबत नाराजांना संधी आणि प्रादेशिक समतोल असे एका दगडात अनेक पक्षीही मारले आहेत. काय आहे हे समतोलाचे गणित?
शिवाजीराव मोघे
शिवाजीराव मोघे हे काँग्रेसचे जुणे जाणते ज्येष्ठ नेते. प्रामुख्याने आदिवासी नेता अशी त्यांची खास ओळख. गेली अनेक वर्षे ते काँग्रेसचे निष्ठावान राहिले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर आणि अर्णी या विधानसभा मतदारसंघातून अनेक वेळा आमदार राहिले आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये त्यांना आपला मतदारसंघ राखता आला नाही. 2009 ते 2014 या काळात त्यांच्याकडे राज्याचे सामाजिक न्याय मंत्रीपद होते. मोघे यांच्या कारकीर्दीबद्दल थोडेसे जाणून घ्यायचे तर 1980, 1985 आणि 1999 या काळात ते विधानसभेवर आमदार राहिले आहेत. दुसऱ्या बाजूला नागपू जिल्हा पालकमंत्रीपदही त्यांनी काही काळ भूषवले आहे. शिवाजीराव मोघे हे आदीवसी नेते आहे. ते विदर्भातून येतात. त्यांच्या रुपात काँग्रेसला विदर्भात हाललेला पाया पुन्हा भक्कम करता येऊ शकते. (हेही वाचा, Nana Patole: नाना पटोले यांचे प्रदेशाध्यक्ष होणे म्हणजे पक्षाची गरज आणि काँग्रेस नेतृत्वाकडून सांगावा सुद्धा)
बसवराज पाटील
बसवराज पाटील यांची काँग्रेस प्रदेश समितीमध्ये कार्यकारी अध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा वर्णी लागली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथून येतात. काँग्रेस हायकमांडची त्यांच्यावर विशष मर्जी असल्याचे दिसते. प्रामुख्याने उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात बसवराज पाटील यांचा विशेष प्रभाव आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाखुरकर यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. काँग्रेसनिष्ठा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. त्यातूनच त्यांची या पदावर दुसऱ्यांदा वर्णी लागल्याचे बोलले जाते.
मोहम्मद आरिफ नसीम खान
मोहम्मद आरिफ नसीम खान (Mohammed Arif (Naseem) Khan) हा काँग्रेसचा मुस्लिम चेहरा आहे. मुंबई काँग्रेसचा एक निष्ठावान चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. ते महाराष्ट्रातील पहिले मुस्लिम गृहराज्यमंत्री असल्याचे सांगितले जाते. (हेही वाचा, स्थानिक निवडणूकींंसाठी कॉंग्रेस सज्ज, Nana Patole यांच्याकडे महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोबतच 'या' दिग्गज नेत्यांकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी)
कुणाल पाटील
कुणाल पाटील हे धुळे ग्रामिण विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर काँग्रेसचे प्रतिनिधीत्व करतात. काँग्रेस हायकमांडने त्यांना राज्याच्या कार्यकारीणीत कार्यकारी अध्यक्ष म्हणून संधित दिली आहे. मिळालेल्या संधिबाबत बोलताना कुणाल पाटील यांनी सांगितले, मावळते प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने चांगले काम केले. आता काँग्रेसला पुन्हा एकदा पहिले वैभवाचे दिवस दाखविण्यासाठी नाना पटोले यांच्यासोबत चांगले काम करु.
चंद्रकांत हंडोरे
चंद्रकांत हंडोरे हे काँग्रेस पक्षाचे मुंबईतील नेते आहेत. चेंबूर विधानसभा मतदारसंघातून ते माजी आमदार राहिले आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आहेत. विधानसभा निवडणूक 2019 मध्ये पराभव झाल्याने विधानपरिषदेवर संधी मिळावी अशी हंडोरे यांची इच्छा होती. परंतू, त्यांची इच्छा फळाळा आली नाही. परिणामी हंडोरे यांनी मागे एकदा काँग्रेस सोडण्याची भाषा केली होती. अर्थात त्यांनी काँग्रेस सोडली नाही. त्याचे फळही त्यांना मिळाले. काँग्रेस हायकमांडने त्यांना राज्याच्या कार्यकारीणीत कार्यकारी अध्यक्ष म्हणून संधित दिली आहे.
प्रणिती शिंदे
विधानसभेत आमदार असलेल्या प्रणिती शिंदे या माजी केंद्रीय माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. काँग्रेस हायकमांडच्या जवळचे व्यक्तिमत्व अशी सुशिलकुमार शिंदे यांची ओळख आहे. प्रणिती शिंदे यांची ओळख ठरण्यात सुशील कुमार यांची सावली महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे सहाजीकच त्यांच्याके माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री, माजी राज्यपाल सुशिलकुमार शिंदे यांची कन्या म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाते. अद्याप पर्यंत तरी त्यांच्या कामातून त्यांची विशेष ओळख पुढे आली नाही. राज्याच्या कार्यकारीणीत कार्यकारी अध्यक्ष म्हणून मिळालेल्या संधिचा त्या पक्षाला कसा फायदा करुन देतात याबाबत उत्सुकता आहे.