Eknath Shinde, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

नुकतेच राज्यातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस (Eknath Shinde-Devendra Fadnavis) सरकारला एक वर्ष पूर्ण झाले, मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) करण्यात आलेला नाही. आता महाराष्ट्रातील बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार जुलै महिन्यात होण्याची शक्यता आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार केंद्रातील मंत्रिमंडळावर अवलंबून आहे का?, असे विचारले असता फडणवीस यांनी त्यास स्पष्टपणे नकार दिला. ते म्हणाले, ‘दोन्ही गोष्टी वेगळ्या आणि असंबंधित आहेत, तसेच राज्य मंत्रिमंडळातून काही मंत्र्यांना वगळण्यात येणार असल्याची अटकळही ‘निराधार’ आहे.’

दुसरीकडे आज सायंकाळी ठाण्यात आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याची पुष्टी केली. गुरुवारी आषाढी एकादशीनिमित्त शासकीय पूजेसाठी पंढरपुरात असलेले शिंदे सायंकाळी फडणवीस यांच्यासह दिल्लीला रवाना झाले होते. शहा यांची भेट घेऊन हे दोघे पहाटे मुंबईला परतले, अशी माहिती सूत्रांनी दिली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबतच ही बैठक झाल्याचे बोलले जात आहे.

गुरुवारी रात्रीच्या दिल्लीतील आपल्या बैठकीबद्दल बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, ‘राज्य आणि केंद्रामध्ये अनेक मुद्दे आहेत, त्यापैकी काहीसाठी तातडीच्या बैठकांची गरज असते.’ ते पुढे म्हणाले, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत माननीय मुख्यमंत्री निर्णय घेतील, पण मला असे वाटत आहे की जुलै महिन्यात विस्तार होईल. केंद्राचा विस्तार कधी होणार हे आम्हाला माहित नाही, आम्हाला राज्याच्या विस्तारात जास्त रस आहे.’ (हेही वाचा: PM Narendra Modi Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिंदे गटातून 5 नावे चर्चेत, महाराष्ट्रतील भाजप मंत्र्यांची पडणार विकेट? घ्या जाणून)

दरम्यान, अहवालानुसार शिवसेनेला केंद्रीय मंत्रिमंडळात दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव, भावना गवळी, राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे आणि गजानन किर्तीकर यांची नावे आघाडीवर आहेत. या नावांपैकी दोन नावांना पंतप्रधान मोदी आणि अमित शाह हिरवा कंदील दाखवू शकतात. मात्र शिंदे यांनी केंद्राकडे तीन मंत्रिपदे मागितली आहेत. त्यानुसार दोन कॅबीनेट आणि एक राज्यमंत्रीपद अशी वाटणी होऊ शकते.