महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज (15 डिसेंबर) नागपूर मध्ये महायुती सरकारचा मंत्रिमंडळविस्तार (Maharashtra Cabinet Expansion) संपन्न होणार आहे. महायुती सरकार मध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये कोण कोण मंत्रीपदाची शपथ घेणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दरम्यान आज संध्याकाळी 4 च्या सुमारास हा शपथविधी सोहळा संपन्न होईल. नागपूर मध्ये तब्बल 33 वर्षांनंतर मंत्रीपदाचा शपथविधी होणार आहे.
288 विधानसभा जागांचा निवडणूक निकाल जाहीर झाला त्यामध्ये भाजपाला 132, शिवसेनेला 57 आणि एनसीपीला 41 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आता मंत्रिपदाची माळ देखील पक्षाला मिळालेल्या जागांवरूनच तिन्ही पक्षांत विभागली जाणार आहे. त्यामध्ये अनेक महत्त्वाच्या जागांवरून तिन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी तिन्ही पक्षांचा युतीमध्ये योग्य तो सन्मान राखत मंत्रीपदं दिली जातील असं म्हटलं होतं. तसेच मंत्र्यांचं मूल्यांकन करूनच ही मंत्रिपदं दिली जातील असेही ते म्हणाले होते. त्यामुळे नव्या सरकार मध्ये कोणाची वर्णी लागणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे.
33 वर्षांनी नागपूर मध्ये मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा
नागपूर मध्ये 33 वर्षांनी आज महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. यापूर्वी 1991 साली शिवसेनेमधून छगन भुजबळ कॉंग्रेस मध्ये आले होते तेव्हा त्यांना थेट मंत्रिपद देण्यात आले होते. त्यांचा शपथविधी नागपूर मध्ये हिवाळी अधिवेशनात झाला होता त्यामुळे तो नागपूर मध्ये संपन्न झाला होता. यंदाही मंत्रीपदाचा शपथविधी नागपूर मध्ये होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर हा दुसरा मंत्रिमंडळ शपथविधी सोहळा आहे. राजभवनाच्या लॉन वर हा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. Cabinet Expansion In Maharashtra: भाजप गृहमंत्रालय स्वतःकडे ठेवणार? एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना कोणते खाते मिळणार? वाचा सविस्तर वृत्त .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नागपूर मध्ये येणार आहेत. त्यामुळे या नागपूरात त्यांंचं उत्साहात स्वागत होणार आहे. त्यांच्या निवासस्थानी देखील खास तयारी करण्यात आली आहे.