शिंदे-फडणवीस सरकारचा (Shinde-Fadnavis Government) बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज (9 ऑगस्ट) पार पडणार आहे. सकाळी 11 वाजता राजभवनावर (Rajbhavan) हा सोहळा पार पडणार आहे. भाजपा आणि शिंदे गटातील आमदारांचा आज शपथविधी होणार आहे. महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष सध्या सर्वोच्च न्यायालय आणि खरी शिवसेना कुणाची यासाठी दावे-प्रतिदावे निवडणूक आयोगात होत असताना आता होणार्या या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सार्यांचेच लक्ष लागले आहे. शिंदे- फडणवीस यांच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? यासाठी विरोधक आणि जनतेमधून सवाल विचारले जात असताना आता अखेर 40 दिवसांनी राज्याच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, आज भाजपाकडून 9 शिंदे गटाकडून 9 आमदारांचा शपथविधी होऊ शकतो. यामध्ये भाजपा चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, प्रविण दरेकर यांना संधी देऊ शकते. तर शिंदे गटातून दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर, शंभुराजे देसाई आदींच्या गळ्यात पुन्हा मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर पडताना ज्या शिवसेना आमदारांनी आपली मंत्रिपदं सोडली त्यांना आता पहिल्या टप्प्यांत मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे.
कुठे पाहू शकाल शिंदे-फडणवीस सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार लाईव्ह
View this post on InstagramA post shared by MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr)
आगामी 15 ऑगस्ट अर्थात देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राज्यातील जिल्ह्यांना पालकमंत्री देखील नेमणं गरजेचे असल्याने या मंत्रिमंडळ विस्तारासोबतच ती यादी देखील जाहीर केली जाईल. त्यामुळे या यादीकडेही लक्ष असणार आहे. राज्यात मंत्री नसल्याने सचिवांकडे राज्याचा कारभार द्यावा लागला होता त्यावरूनही विरोधकांकडून शिंदे-फडणवीस यांच्या सरकार वर टीका होत होती.
आज मंत्रिमंडळ विस्तारानंतर काही महिन्यांनी पुढील टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेच्या नोटीसीचं प्रकरण प्रलंबित असले तरीही कोर्टाने राज्यात मंत्रिमंडळ विस्तारावर बंदीचे कोणतेही निर्देश दिलेले नाहीत त्यामुळे आता हा मंत्रिमंडळ विस्तार छोटेखानी स्वरूपात राजभवनात होणार आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये पुढील सुनावणी 12 ऑगस्ट दिवशी होणार आहे.