Maharashtra Budget Session 2022: राज्यपाल BS Koshyari यांच्या अभिभाषणाच्या वेळेस सत्ताधारकांचा गदारोळ; भाषण थांबवत कोश्यारी पडले सभागृहाबाहेर
Governor Bhagat Singh Koshyari File Image (Photo Credits-Twitter)

महाविकास आघाडी सरकार विरूद्ध भाजपा हा संघर्ष आज राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पहायला मिळाला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अभिभाषणाच्या वेळेस आज घोषणाबाजी झाल्याने मोठा गदारोळ झाला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari) यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात केलेल्या विधानावरुन सत्ताधारी आमदार आज अभिभाषणाच्या वेळेस आक्रमक झाले त्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावेळी घोषणाबाजी सुरू केली. नंतर कोश्यारी यांनी आपलं भाषण थांबवत सभागृह सोडलं. अवघ्या 22 सेकंदात राज्यपालांनी आपले भाषण आवरत पटलावर ठेवले.

भाजपा आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी सभागृह परिसरात मीडीयाशी बोलताना या घटनेचा निषेष व्यक्त केला आहे. राज्यपालांना राष्ट्रगीतासाठी दोन-दोन वेळेस माईकवरून आमदारांना विनंती करावी लागते हे दुर्भाग्याचं आहे. ही सत्ताधार्‍यांची, त्यांच्या गटानेत्यांची जबाबदारी होती. पण ते निभावू शकले नसल्याने भाजपाने महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. सत्ताधार्‍यांकडून राज्यपालांचा निषेध करताना 'राज्यपाल हटाव' असा देखील नारा देण्यात आला आहे. दरम्यान बीडचे आमदार संजय दौंड यांनी सभागृह परिसरात शीर्षासन करत राज्यपालांचा निषेध नोंदवला आहे. हे देखील नक्की वाचा: Maharashtra Budget Session 2022: राज्य सरकारचं आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; 11 मार्चला सादर होणार बजेट .

इथे पहा राज्यपाल अभिभाषण

आजपासून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरूवात झाली आहे. 22 दिवस म्हणजे 25 मार्च पर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार आहे. 11 मार्च दिवशी अर्थसंकल्प सादर होणार आहे.