महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज (24 फेब्रुवारी) पासून सुरू होणार आहे. दरम्यान महाविकास आघाडीचे हे विधी मंडळ अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. काल (23 फेब्रुवारी) दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घेतलेल्या पत्रकारपरिषदेमध्ये त्यांनी आज शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करणार असल्यची माहिती दिली आहे. तर सरकार राज्यातील लोकांची फसवणूक करत आहे. पीक कर्जाव्यतिरिक्त अन्य कर्जाची माफी केली नसल्याचे आरोप विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लावले आहेत. यंदाच्या अधिवेशनामध्ये महाविकास आघाडी 6 मार्च दिवशी राज्याचा अर्थसंकल्प (Budget) सादर करणार आहे. हे अधिवेशन 20 मार्च पर्यंत चालणार आहे. महाविकास आघाडीने स्वतःमधील सुसंवाद वाढवावा,तोपर्यंत चहापानाला भाजप जाणार नाही: देवेंद्र फडणवीस.
दरम्यान आजपासून सुरू होणार्या अर्थसंकल्पामध्ये जीएसटी अध्यादेश 2020 विधेयक विधानसभेसोबतच विधानपरिषदेमध्येही मांडले जाणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायत व औद्योगिक नगरी (सुधारणा) अध्यादेश, 2020 चे क्रमांक 1 आणि 4 हे विधेयक नगरविकास मंत्री विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर केली जाणार आहेत. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास विनिमय) (सुधारणा) अध्यादेश 2020 क्रमांक दोन आणि तीन हे विधेयक राज्याचे पणन मंत्री दोन्ही सभागृहात सादर करणार आहेत. यासोबतच महिला सुरक्षा आणि अन्य विषयांवर यंदाच्या अर्थसंकल्पात चर्चा रंगणार आहे.
विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल राज्यात विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने पत्रकार परिषद घेत सरकारवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान 'महाविकास आघाडीच्या सरकारमधील पक्षांमध्ये सुसंवाद नसल्यचं सांगत ते जे करतात आणि जे बोलतात यामध्ये साधर्म्य नाही. त्यामुळं त्यांनी आधी आपसांत संवाद साधावा. मग आम्हाला चहापानासाठी व सुसंवादासाठी बोलवावं,' असं मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं आहे.