Ajit Pawar | X

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाकडून आज (28 जून) अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget) मांडला जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणूकांपूर्वीचा हा अर्थसंकल्प असल्याने यामध्ये घोषणांचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आजचा अर्थसंकल्प अजित पवार (Ajit Pawar) मांडणार असून यामध्ये शेतकरी, महिला, तरूण यांच्यासाठी कोणत्या घोषणा होणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान काल जाहीर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज 7.6% वर्तवण्यात आला आहे. ही वाढ देशाच्या अर्थव्यवस्थेइतकीचं असून राज्याचे स्थूल उत्पादन 40 लाख 44 हजार 898 कोटी अपेक्षित आहे. कृषी क्षेत्रामध्येही 9.1% वाढ अपेक्षित आहे.

दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर आहे. 2022-23 मध्ये दरडोई उत्पन्नामध्ये तेलंगणा पहिल्या क्रमांकावर, त्या खालोखाल कर्नाटक, हरियाणा, तामिळनाडू, गुजरात आहे. महाराष्ट्राचे 2023-24 मध्ये दरडोई उत्पन्न 2 लाख 77 हजार 603 रूपये अपेक्षित आहे.

मुंबई मध्ये विधिमंडळाचे हे पावसाळी अधिवेशन 27 जून ते 12 जुलै दरम्यान होणार आहे. राज्यात येत्या 3-4 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणूका असल्याने सरकारला दुसऱ्यांदा अंतरिम अर्थसंकल्प सादर करावा लागत आहे. आज दुपारी दोन वाजता हा अर्थसंकल्प सादर होणार आहे. नक्की वाचा: 'अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्याबाबत मी काहीही चुकीचे बोललो नाही'; वादानंतर Sudarshan Chowdhury यांचे स्पष्टीकरण (Video).

इथे पहा आजचं अधिवेशनाचं कामकाज

राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं आणि त्यामध्ये सगेसोयर्‍यांचा समावेश व्हावा या मागणीसाठी एकीकडे मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत तर दुसरीकडे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे ओबीसी कोट्यात मराठ्यांचा समावेश करण्यास विरोध करत आहेत. त्यामुळे या आव्हानाला राज्य सरकार कसं तोंड देणार? त्याबाबत काही घोषणा होणार का? याकडेही लक्ष असणार आहे.