महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर झाला. ऑनलाईन निकाल समजल्यानंतर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून दहावी परीक्षेतील उत्तीर्ण व अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका जिल्ह्यातील शाळांना प्राप्त झाल्या आहेत. मात्र यात अनेक विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका नाहीत. त्यामुळे पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी समस्या निर्माण होत आहे. वाशी परीक्षा मंडळाने पाठवलेल्या गुणपत्रिकेच्या यादी सर्व विद्यार्थ्यांची नावे असली तरी त्यांच्या गुणपत्रिका नाहीत.
लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, यात पालघर तालुक्यातील केळवे आदर्श विद्यालय, विद्या वैभव विद्यालय, स. त्तू. कदम विद्यालय इत्यादी अनेक विद्यालयांचा समावेश आहे. तसंच जिल्ह्यातील शाळांमध्येही काही विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत अडथळा निर्माण होत असल्याने विद्यार्थी व पालक चिंतेत आहेत. (दहावीचा निकाल mahresult.nic.in वर जाहीर,गुणांच्या आकडेवारीत लातूर मधील 16 विद्यार्थ्यांची 100 टक्के कामगिरी)
गुणपत्रिका मिळवण्यासाठी आता वाशी मंडळाकडे शाळांना पाठपुरावा करावा लागेल. याउलट गुणपत्रिका खराब असल्याने त्या शाळांकडे पाठवण्यात आल्या नाहीत, असे कारण वाशी मंडळाने दिले आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचे सचिव शरद खंडागळे यांनी लोकसत्ताला दिलेल्या माहितीनुसार, मुंबई मंडळांतर्गतच्या 1400 गुणपत्रिका खराब असून त्या फेरछपाईसाठी पुणे येथे पाठवण्यात आल्या आहेत. फेरछपाईनंतर त्या शाळांना वितरीत केल्या जातील. तसंच या संदर्भात शाळांच्या मुख्यध्यापकांना माहिती देण्यात आली आहे.