दहावी (SSC), बारावीच्या (HSC) बोर्ड परीक्षा या विद्यार्थ्यांच्या करियरच्या दृष्टीने निर्णायक असतात. विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये गोंधळ, चूकीच्या गोष्टी, अफवा, पेपर फूटीची प्रकरणं टाळण्यासाठी आता बोर्डाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षेला निर्धारित वेळेनंतर 10 अधिकची मिनिटं दिली जाणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेचे पेपर दिल्यानंतर ते वाचून नीट लिहण्यासाठी प्रश्नपत्रिका 10 मिनिटं फायद्याची ठरणार आहेत.
बोर्डाच्या परीक्षेमध्ये मागील काही वर्षात परीक्षा सुरू होण्यापूर्वी मोबाईलवर प्रश्नपत्रिका आढळली आहे. अनेकदा अफवांमुळेही विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचं समोर आले आहे. भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत परीक्षा पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून रद्द करण्यात आलेली आहे. पण यानंतर काही आवाज उठवला होता त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत पालक, विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दिली जाणार आहेत. गेल्या वर्षी देखील वेळ वाढवून देण्यात आली होती तशीच यंदाही कायम असेल. Maharashtra SSC, HSC Exam 2024 Dates: राज्यातील दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या तारखा .
विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेनंतर 10 मिनिटं मिळणार असली तरीही परीक्षा केंद्रांवर त्यांना अर्धा तास आधीच पोहचणं बंधनकारक करण्यात आले आहे. सकाळी 11 च्या परीक्षेसाठी 10.30 आणि दुपारी 3 च्या परीक्षेसाठी 2.30 वाजता विद्यार्थ्यांना हजर रहावं लागणार आहे. प्रश्नपत्रिकांचं वाटप 11 आणि 3 वाजताच होणार आहे.
महाराष्ट्रात यंदा बारावीची बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी तर दहावीची बोर्ड परीक्षा 1 मार्च पासून सुरू होणार आहे. दहावीची श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत परीक्षा १० ते २९ फेब्रुवारी दरम्यान होईल. बारावीची श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा २ ते २० फेब्रुवारी, २०२४ मध्ये आयोजित करण्यात आली आहे.