महाराष्ट्रात येत्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभा (Maharashtra Assembly Elections) निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे, तत्पूर्वी आज मुंबईत राज्य निवडणूक आयोगाच्या (Election Commission) आयुक्तपदी यु. पी. एस. मदान (U.P.S Madan) यांची नेमणूक करण्यात आली आहे. याविषयी राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार मदान यांनी राज्याचे सहावे राज्य निवडणूक आयुक्त म्ह्णून पदभार स्वीकारला असून भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यातर्फे मदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.यापूर्वी आयुक्तपदी रुजू असणाऱ्या ज. स. सहारिया (J.S. Sahariya) यांचा कार्यकाळ काल 4 सप्टेंबर रोजी पूर्ण झाला.
आज, निवडणूक आयोग सचिव किरण कुरुंदकर व अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत मदान यांनी पदभार स्वीकारला आहे. याबाबत जनसंपर्क अधिकारी जगदीश मोरे यांनी ट्विटच्या मार्फत मदन यांचे स्वागत केले आहे.
जगदीश मोरे ट्विट
Shri. U. P. S. Madan has taken over the charge of State Election Commissioner, Maharashtra. He has served as Chief Secretary, MMRDA Commissioner, CEO, MHADA, Chief Electoral Officer etc.
राज्याचे सहावे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून श्री. यू. पी. एस. मदान यांनी आज पदभार स्वीकारला. pic.twitter.com/eMiUxtwVGi
— Jagdish More (@jagdishtmore) September 5, 2019
प्राप्त माहितीनुसार, मदान हे 1983 पासून भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत. याआधी त्यांनी मुख्य सचिवपदाचीही धुरा देखील सांभाळली आहे. तसेच राज्यात विविध ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी व मंत्रालयात अपर मुख्य सचिव म्हणून सेवा बजावली. भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून राज्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे काम पाहिले आहे. एमएमआरडीए (MMRDA) आयुक्त आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (MHADA) मुख्य कार्यकारी अधिकारी असा प्रदीर्घ अनुभव असणारे मदान आता आयुक्तपदाची धुरा सांभाळणार आहेत.
दरम्यान अनेक मंडळींकडून विधानसभा निवडणुकांच्या बाबत अंदाज बांधले जात होते. सध्या राज्यात गणेशोत्सव असल्याने 12 सप्टेंबर नंतर आचारसंहिता लागू करण्यात येईल व साधारण 15 ऑक्टोबरच्या सुमारास मतदान पार पडेल अशी सह्क्यता चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे यांनी वर्तवली होती.