बारामती (Baramati) मतदार संघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्ह्णून ख्यात आहे, बारामती साठी अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या कामानंतर याठिकाणहून विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) उमेदवारीसाठी अजित पवार हे एकमेव उमेदवार आहेत अशा आशयाचे विधान करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित यांची उमेदवारी जाहीर केली आहे. काल अजित पवार यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिल्यावर सुरु असलेल्या एकूणच प्रकारावर आज पत्रकार परिषदेनंतर प्रकाश पडला, यानंतर जयंत पाटील हे माध्यमांशी बोलत होते. या संदर्भात प्रतिक्रिया देताना जयंत पाटील आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत. माझ्या उमेदवारीबाबत ते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल,अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली होती.
जयंत पाटील यांनी या संदर्भात बोलत असताना , "अजित पवार यांनी नाही म्हंटल तरी बारामतीकर त्यांना घरातून बाहेर आणून निवडणुकीत उभे करतील लोकांचे त्यांच्यावर प्रेम आहे म्ह्णून तेच बारामती येथून उमेदवार असतील" असेही म्हंटले आहे.तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीतील आपल्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नावांमधील एक म्हणजे अजित पवार यांनी काल एकाएकी आपल्या आमदार पदाचा राजीनामा दिल्यावर पवार कुटुंबासोबतच राजकीय वर्तुळात देखील गदारोळ झाला होता. यानंतर संपूर्ण 24 तास पवार कुटुंबात हे राजीनामा नाट्य पार पडले, काही जण अजित पवार यांनी नाराजीनामा दिला आहे असे म्हणत होते तर काहींनी याला पवार कुटुंबीयांचा गृहक्लेश असे देखील नाव देऊन टाकले होते. मात्र आज धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत स्वतः अजित पवार यांनी आपली राजीनाम्याच्या मागील भूमिका स्पष्ट केली. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्यसह शरद पवार यांच्यावर लागण्यात आलेय शिखर बँक घोटाळ्यासंबंधी गुन्ह्यावरून विषण्ण होऊन आपण हा राजीनामा दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले होते.