महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: 30% कर्मचा-यांना नारळ देण्याचा राज्य सरकारचा घाट; मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा भिवंडी सभेत घणाघाती आरोप
Raj thackeray (Photo Credit: IANS)

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thakre) यांचा जाहीर सभांचा सपाटा सुरु असून 11 ऑक्टोबर मध्ये भांडूप पूर्व, पश्चिम आणि घाटकोपर मध्ये जाहीर सभा घेतल्यानंतर आज (12 ऑक्टोबर) ला भिवंडी (Bhiwandi) मध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत राज ठाकरे यांना सरकारवर आगपाखड करत लवकरच राज्य सरकार 30% कर्मचा-यांना नारळ देण्याचा घाट घालतआहे असे सांगितले. नोकऱ्या नाहीत, लोकांना कामावरून काढून टाकताहेत, राज्यातले, देशातले उद्योग बंद होताहेत. सरकारी नोकरही नोकऱ्या गमावत आहेत, भाजपची घोषणा होती २०१४ ला कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, आज आम्ही विचारतोय कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भिवंडी येथील प्रचारसभेत केला.

या प्रचार सभेत राज्य सरकार सह विरोधकांवरही सडकून टीका केली. एका पक्षातून दुस-या पक्षात जाणा-या दलबदलू उमेदवारांना यंदाच्या निवडणुकीत घरी बसवा. अशा लोकांबद्दल जरा देखील चीड असेल तर ती मतपेटीतून व्यक्त करा आणि मनसेला एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या. रस्त्यावरचा विरोधी पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकांना दाखवला आहे. आता विधानसभेतला विरोधी पक्ष मी तुम्हाला दाखवून देईन,' असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं.

या सभेत शेतकरी, दुष्काळ, बेरोजगारी यांसारख्या ब-याच प्रश्नांवर हात घातला. त्याचबरोबर भिवंडी मतदारसंघाची एक जुनी आठवणही त्यांनी या सभेत व्यक्त केली. मी लहान असताना 1982 साली पहिल्यांदा भिवंडीत आलो होतो. 12 वर्ष भिवंडीत शिवजयंती साजरी करायला बंदी होती. 12 वर्षांनी पहिल्यांदा शिवजयंती साजरी झाली तेव्हा बाळासाहेबांबरोबर भिवंडीत आलो होतो.

हेदेखील वाचा- बाळासाहेबांच्या शिवसेनेत आयारामांची गरज नव्हती - राज ठाकरे; गोरेगाव येथील प्रचार सभेत आरे बचाव, मुंबई मेट्रो 3 सह सरकारवर टीका करताना पहा काय म्हणाले मनसे प्रमुख

कसे रस्ते आहेत, तुम्हाला चीड येते की नाही. हतबल होऊन बसला आहात तुम्ही. तुम्हाला या गोष्टींचा राग कसा येत नाही?मेक्सिकोत एका मंत्र्याला रस्ते चांगले नाहीत, म्हणून लोकांनी फरफटत नेले. तुम्हाला इतकी वर्षं झाली तरी तुमच्यावरील अन्यायाचा राग का येत नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी या सभेत विचारला.

भिवंडीतला यंत्रमागाचा उद्योग हळूहळू बंद होताहेत. राज्यातले, देशातले उद्योग बंद होताहेत. भिवंडीत वीजेचा प्रश्न मोठा आहे. लोकांना अव्वाच्या सव्वा वीजबिलं येत आहेत. पण आम्ही तरीही शांत असं म्हणतं भिवंडीतील अनेक समस्यांना लोकांसमोर आणून गप्प राहणा-या जनतेच्या डोळ्यात अंजन घातले आहे.

थोडक्यात आजची राज ठाकरेंची सभा देखील दणक्यात आणि अपेक्षेप्रमाणे झाली असे म्हणायला हरकत नाही. भिवंडीतील जनतेची दबती नस ओळखत राज ठाकरेंनी उजेडात आणलेल्या प्रश्नांवर जनता विचार करुन येथील राजकीय चित्र बदलणार का हे येत्या 24 ऑक्टोबरला समजेलच.