Maharashtra Vidhan Sabha Elections2019: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. सत्ताधारी भाजप(BJP), शिवसेना (Shiv Sena) आणि विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) , काँग्रेस (Congress) यांच्यासह राज्यातील प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अपवाद मात्र राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) या पक्षाचा. हा पक्ष अद्यापही कोणत्याही ठोस निर्णयाप्रत आला नाही. हेच निमित्त साधत भारतीय जनता पक्षाने आपल्या ट्विटर हँडलवरुन राज ठाकरे आणि व्यंगचित्राच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. या व्यंगचित्राला 'राज'मान्य खेळात आता ही सोंगटी कोणत्या चौकटीत पडणार? अशी पंचलाईन देऊन चिमटाही काढला आहे. आता या व्यंगचित्राला व्यंगचिंत्रकार राज ठाकरे किंवा मनसे काय प्रतिक्रिया देते याबाबत उत्सुकता आहे.
निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर काही वेळातच भाजपने व्यंगचित्राच्या माध्यमातून मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे हे विशेष. व्यंगचित्रात राज ठाकरे यांच्याशी साधर्म्य असलेली एक व्यक्तिरेखा दाखविण्यात आली आहे. या व्यक्तीरेखेचा उल्लेख 'सोंगटी' असा करण्यात आला आहे. (हेही वाचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार: सूत्र)
राज ठाकरे हे आपल्या आक्रमक भाषण आणि राजकारणशैलीसाठी लोकप्रिय आहेत. त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी मित्रत्वाचे संबंध आहेत. परंतू, राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिका निराळ्या असतात. मैत्री आणि या भूमिका यात कधी गल्लथ होत नसते. त्यामुळे ज्यांच्याशी मैत्री आहे अशांनाही राज ठाकरे आपल्या भाषणातून निशाण्यावर घेतात. उपहास, विनोद, नकला आदींच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी आतापर्यंत अनेकांना घायाळ केले आहे. लोकसभा निवडणुकीत तर राज ठाकरे यांनी मनसेचा एकही उमेदवार उभा न करता सत्ताधारी भाजपला जेरीस आणले होते.
लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप हा बहुमताने विजयी झाला. पण, राज ठाकरे यांच्या घणाघाती भाषणामुळे भाजपलाही घाम फोडल्याचे चित्र त्यावेळी पाहायला मिळाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे भाजपचे दोन नेते राज यांच्या रडारवर होते. या निवडणुकीत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाला तंत्रज्ञानाचीही जोड दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली विविध भाषणं आणि वास्तव स्थिती राज ठाकरे आपल्या भाषणातून दाखवत असत. त्यांच्या भाषणाला तुफान गर्दी होत असे. पण, त्याचा काहीच परिणाम लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला नाही.
भाजप ट्विट
विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या, आता ही सोंगटी कोणत्या चौकटीत पडणार??
शेवटी जनतेच्या मनोरंजनाचा प्रश्न आहे...!! pic.twitter.com/w3jg22M7Uv
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 21, 2019
या वेळी मनसे विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याची चर्चा आहे. प्रत्यक्षात तसे घडले तर राज ठाकरे यांचा मनसे कशी कामगिरी करतो हे पाहायला मिळेल. तसेच, राज ठाकरे यांच्या उमेदवारांमुळे कोणत्या पक्षाला फटका बसतो. मनसे किती मतं खेचतो. आज घडलीला मतांच्या राजकारणात मनसेचा भाव काय या सर्वच प्रश्नांची उत्तरं पाहालया मिळणार आहे.