महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार: सूत्र
MNS | (Photo Credits: Twitter)

Maharashtra Assembly Elections 2019: राज्यात तोंडावर आलेली विधानसभा निवडणूक लढवावी की नाही याबाबत संभ्रमात असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अखेर एका निर्णयाप्रत आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे निवासस्थान 'कृष्णकुंज' येथे मनसे पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत आगामी विधानसभा लढण्यावर एकमत झाले. विधानसभा निवडणुकीत या वेळी मनसे ठाणे, मुंबई, नाशिक, पुणे, सोलापूर, पंढरपूर, हिंगोली, औरंगाबाद आदि जिल्ह्यांमदून साधारण 100 विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार उभे करेन.

सूत्रांनी माहिती देताना सांगितले की, राज यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश देतानाच इच्छुक उमेदवारांची यादीही मागवली. मनसेचा प्रभाव असलेल्या शहर आणि ग्रामिण भागातील विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचा पक्षाचा मानस आहे. दरम्यान, मनसे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आघाडी करेन काय? असे विचारले असता, तशी शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच, विधानसभा निवडणुकीबाबत राज ठाकरे येत्या एक ते दोन दिवसांत निर्णय जाहीर करणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. (हेही वाचा, Assembly Elections 2019: विधानसभा निवडणूक लढवावी की नाही? मनसे पेचात)

दरम्यान, आजच्याप्रमाणेचआठवडाभरापूर्वीही राज ठाकरे यांच्याच नेतृत्वाखाली 'कृष्णकुंज' येथे बैठक पार पडली होती. या बैठकीत मनसे नेत्यांमध्ये विचारांचे दोन प्रवाह पाहायला मिळाले होते. यातील एक प्रवाह हा विधानसभा निवडणूक न लढविण्याच्या विचाराचा होता. तर, एक प्रवाह विधानसभा निवडणूक लढविण्याच्या विचाराचा होता. या बैठकीत राज यांनी दोन्ही प्रवाहांच्या नेत्यांचे विचार ऐकूण घेतले होते. त्यानंतर आजच्या बैठकीत निवडणूक लढविण्यावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.