Maharashtra Assembly Budget Session:  राम मंदिर निधी संकलन मुद्द्यावरुन विधानसभेत गदारोळ, कामकाज 10 मिनीटांसाठी तहकूब
Maharashtra Legislative Assembly | (Photo Credit : Youtube)

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Assembly Budget Session) सुरु आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर घमासान चर्चा झाल्यानंतर आज (4 फेब्रुवारी) पुन्हा एकदा विधिमंडळ सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा मुद्दा उपस्थित करत अध्यक्षपदासाठी सरकार निवडणूक कधी घेणार अशी विचारणा केली. यावेळी सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी राम मंदिर (Ram Mandir) निधी संकलनावरुन मुद्दा उपस्थित केला. यावेळी विरोधी पक्ष आक्रमक झाला आणि सभागृहात गदारोळ वाढला. त्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सभागृहाचे कामकाज 10 मनिटांसाठी तहकूब केले.

विधानसभा अध्यक्ष पदाच्या मुद्द्यावरुन बोलत असताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, राज्य सरकार हे घटनेची पायमल्लीकरत आहे. विद्यमान राज्य सरकारने घटनेनुसार राज्य चालवणे अपेक्षीत आहे. त्यांना ते जमत नसेल तर राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी लागेल. आतापर्यंत या राज्याने 51 वेळा घटनात्मक चुका केल्या आहे. सरकारने कितीही वर्षे राज्य करावे परंतू हे राज्य घटनेनुसार चालायला हवे. गेली प्रदीर्घ काळ विधानसभेला अध्यक्ष नाही. राज्य सरकार विधानसभा अध्यक्षपद निवडणूक लावण्यास का घाबरत आहे, असा सवाल उपस्थित करत राज्य घटनेनुसार चालवा अन्यथा राष्ट्रपती राजवट लागल्यास रडू नका, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. (हेही वाचा, Maharashtra Assembly Budget Session 2021: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली जबरदस्त फटकेबाजी; पंतप्रधान मोदी-देवेंद्र फडणवीस यांच्यावर चढवला शाब्दिक हल्ला)

दरम्यान, काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित केला की, राज्यामध्ये राम मंदिर उभारणीच्या नावाखाली निधीसंकलन सुरु आहे. हे निधी संकलन करणारे लोक कोण आहेत? त्यांना राज्य सरकारने पैसै जमा करण्याचा काही ठेका दिला आहे का? हे स्पष्ट करावे अशी मागणी केली.

नाना पटोले यांच्या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार आक्षेप घेतला. आक्रमक होत देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, आजच्या चर्चेचा विषय हा नाही. परंतू, राज्य सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी 'राम मंदिर' या विषयावर चर्चा लावावी. देवेंद्र फडणवीस बोलत असताना विरोधी पक्षातील सदस्यांनी सभागृहात 'जय श्रीराम' अशा जोरदार घोषणा दिल्या. सभागृहात काही काळ गदारोळ पाहायला मिळाला. त्यावर सभागृह अध्यक्षांनी विधानसभेचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केले.