Coronavirus | Representational Image | (Photo Credit: PTI)

महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून हा आकडा आता 490 वर जाऊन पोहोचला आहे. यात भर पडलीय ती नवी दिल्लीतील तबलिगी जमात कार्यक्रमातून महाराष्ट्रात परत आलेल्या लोकांची. यात महाराष्ट्रातून 1225 लोक या कार्यक्रमासाठी गेले होते. त्यातील 1033 सापडले असून त्यातील 738 लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यात सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे यातील 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही खूपच चिंताजनक गोष्ट असून सर्व शासकीय यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत.

महाराष्ट्रातील या 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 2 पुणे, 2 अहमदनगर, 2 पिंपरी-चिंचवड आणि 1 सांगलीमधील रुग्ण आहे, अशी माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे.

पाहा ट्विट: 

हेदेखील वाचा- Coronavirus: देशात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या 2547; 162 जणांना डिस्चार्ज, 62 जणांचा मृत्यू - केंद्रीय आरोग्य मंत्रालय

आज महाराष्टात नव्या 67 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या आता 490 इतकी झाली आहे. त्यापैकी 50 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज मिळाला आहे. तर 26 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या सुरुवातीला हळूहळू आणि आता वेगाने वाढते आहे. त्यामुळे राज्य सरकारही अधिक सतर्क झाले असून, परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, गर्दी करु नये यासाठी लॉकडाऊन असूनही अधिक प्रयत्न केले जात आहेत.

महाराष्ट्रासोबतच देशभरातही कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात आज दिवसभरात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 2547 वर पोहोचली. देशभरात आतापर्यंत 162 कोरोना व्हायरस बाधितांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 62 जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरात उपचार घेत असलेल्या कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 2322 इतकी आहे.