6 डिसेंबर हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस (Mahaparinirvan Diwas) आहे. या दिवशी भीम अनुयायी बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन अर्पण करतात. महाराष्ट्रात राज्य सरकार कडून 6 डिसेंबरला स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. दही हंडी, गणेश विसर्जन नंतर ही राज्य सरकारकडून यंदाच्या वर्षात जाहीर करण्यात आलेली तिसरी सुट्टी आहे. त्यामुळे आता अचानक सुट्टी जाहीर झाल्याने नेमकं उद्या 6 डिसेंबरला राज्यात काय सुरू असेल आणि काय बंद असेल याची कल्पना अनेकांना नाही. तर मग जाणून घ्या उद्या 6 डिसेंबर दिवशी सरकारी कार्यालय, शाळा, बॅंका नेमकं काय सुरू असेल आणि काय बंद असेल?
यंदा 6 डिसेंबरला बाबासाहेबांचा 69 वा महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन 6 डिसेंबर 1956 दिवशी झालं. त्यानंतर हा दिवस बौद्ध धर्मीय आणि भीम अनुयायी महापरिनिर्वाण दिन म्हणून त्यांच्या स्मृतीत पाळतात.
6 डिसेंबरला काय बंद काय सुरू राहणार?
- सरकारी कार्यालय- सरकारने सुट्टी जाहीर केल्याने सारी सरकारी कार्यालयं बंद राहणार आहेत.
- दारूची दुकानं - मुंबई जिल्हाधिकार्यांकडून 6 डिसेंबर हा ड्राय डे जाहीर झाल्याने दारू विक्री बंद राहणार आहे.
- शेअर मार्केट - राज्य सरकारने स्थानिक सुट्टी जाहीर केली असली तरीही शेअर बाजार सुरूच राहणार आहे. Is Stock Market Open Tomorrow? भारतीय शेअर बाजार उद्या सुरु राहणार की महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुट्टी? घ्या जाणून
- बॅंका - राज्य सरकारने स्थानिक सुट्टी जाहीर केली असली तरीही स्टेट बॅंक ऑफ इंडिया सह प्रायव्हेट बॅंकाही सुरू राहतील.
- शाळा, कॉलेज - मुंबईतील सर्व शाळांना शिक्षण विभागाच्या क्लस्टर रिसोर्स सेंटर (CRC) कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार उद्या शाळा बंद ठेवल्या जातील. शिक्षण उपसंचालकांनी मुंबईतील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी सुट्टी असेल.
दरम्यान मुंबई मध्ये चैत्यभूमीवर भीम अनुयायी मोठ्या संख्येने जमून बाबासाहेबांच्या स्मृतीला वंदन करतात त्यामुळे दादर शिवाजी पार्क परिसरामध्ये वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. तसेच मध्य रेल्वे कडूनही अधिकच्या मुंबई लोकल्सची तयारी ठेवण्यात आली आहे. (हेही वाचा, Mahaparinirvan Diwas 2024 Traffic Advisory: डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई पोलिसांनी जारी केले 5-7 डिसेंबरसाठी वाहतूक निर्बंध; दादरच्या आसपासच्या वाहनांच्या हालचालींवर होणार परिणाम, पहा तपशील).
महापरिनिर्वाण म्हणजे काय?
महापरिनिर्वाण हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ मुक्ती असा होतो. बौद्ध धर्मातील प्रमुख तत्त्वे आणि उद्दिष्टांपैकी तो एक आहे. याचा अर्थ 'मृत्यूनंतरचे निर्वाण'. बौद्ध धर्मानुसार, जो निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक इच्छा आणि जीवनातील दुःखांपासून मुक्त होईल आणि तो जीवन चक्रातून मुक्त होईल म्हणजेच तो पुन्हा पुन्हा जन्म घेणार नाही. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी हा दिवस महापरिनिर्वाण म्हणून संबोधला जातो.