Maha Vikas Aghadi: 'शरद पवार आहेत महाविकास आघाडी सरकारचे रिमोट कंट्रोल'- Nana Patole
Nana Patole | (Photo Credits: ANI)

सीएम उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचे दिसून येत नाहीये. युतीमध्ये वेळोवेळी बंडखोरीचे आवाज ऐकू येत आहेत. विशेषत: कॉंग्रेसच्या (Congress) बाजूने, स्वतःच्या सरकारवर सतत हल्ला होत आहे. आता सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले आहेत की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे राज्यातील शिवसेनेच्या नेतृत्वातील ‘एमव्हीए सरकार’चे 'रिमोट कंट्रोल' आहे. काँग्रेस नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती आणि महागाईविरोधात पक्षाने सायकल मोर्चा काढला व त्यानंतर राजभवनात जाऊन राज्यपालांना निवेदन दिले. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना कबूल केले की, शरद पवार यांच्याकडे महाविकास आघाडी सरकारचे रिमोट कंट्रोल आहेत. त्यानंतर त्यांनी यावर स्पष्टीकरण देताना म्हटले की, महाविकास आघाडी सरकार बनवण्यात शरद पवार यांचा मोठा वाटा आहे. राज्यातील नेत्यांना-मंत्र्यांना जेष्ठ नेते शरद पवार हे वेळोवेळी मार्गदर्शन करीत आले आहेत, म्हणून ते रिमोट कंट्रोल आहेत.

ते पुढे म्हणाले की, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे तसाच माझा पक्ष वाढवणे हा माझा अधिकार आहे. त्यामुळे शरद पवार आमच्यावर नाराज असण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तसेच भाजपाकडून महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे, असाही आरोप त्यांनी केला. (हेही वाचा: Maratha Reservation: शासनाने मान्य केलेल्या मागण्यांवर प्रशासनाकडून कार्यवाही नाही; संभाजी छत्रपती यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र)

दुसरीकडे, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या म्हणण्यानुसार नाना पटोले ज्या प्रकारे बिनबुडाची वक्त्यव्ये करीत आहेत, यामुळे केवळ महाविकास आघाडी सरकारची प्रतिमाच डागाळली जात नाही तर, भाजपला लक्ष्य करण्याचीही संधी मिळत आहे. महाविक्रस आघाडी सरकारमध्ये फुट पडत असून, एकी नसल्याचा संदेश बाहेर जात आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपली हेरगिरी करत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता.