MahaVikas Aghadi

केंद्र सरकार आणि राज्य सरकार लोकशाहींच्या मुल्यांवर घाला घालत असून विरोधकांवर कारवाई करत असल्याचा आरोप करत छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji nagar) आज महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) जाहीर सभा होणार आहे. सायंकाळी सहा वाजता सांस्कृतिक मंडळ मैदानवर ही  सभा होणार आहे. या सभेसाठी महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे. यामुळे या सभेला जास्त गर्दी जमण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकत्याच झालेल्या तणावानंतर महाविकास आघाडीची ही पहिलीच सभा होणार असल्याचे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे देखील या सभेकडे लक्ष लागले आहे. (Uddhav Thackeray यांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यातून केंद्रीय मंत्री Narayan Rane दोषमुक्त)

पोलिस प्रशासनाने या सभेला सशर्त परवानगी दिली आहे. आजच्या या सभेला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह आघाडीचे नेते पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याने सभेसाठी आयोजकांकडून जय्यत तयारी केली जात आहे. दरम्यान, आजच्या या महाविकास आघाडीच्या सभेकडं संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं असून, राजकीय नेते आज काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान संभाजीनगरनमध्ये सध्या तणावग्रस्त वातावरण असल्याने आजच्या या सभेला परवानगी देताना पोलीस प्रशासनाने काही अटी घालून दिल्याची माहिती मिळाली आहे. सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वंयशिस्त पाळावी, सभेला येताना आणि परत जाताना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी. सभास्थानी कमाल मर्यादेपेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करु नये, यासह अन्य अटीवर सभेला पोलिसांनी परवानगी दिल्याची माहिती आहे.