
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा अर्थात Maha TET Exam 2021 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. डिसेंबर 2021 मध्ये पार पडलेल्या या परीक्षेचा निकाल आता जाहीर झाला आहे. दरम्यान या निकालामध्ये राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती पण निकालाचं प्रमाण अवघं 3.70% आहे. 4 लाख 68 हजार 679 विद्यार्थ्यांपैकी अवघे 17,322 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
महाराष्ट्रात टीईटी परीक्षा 21 डिसेंबर 2021 दिवशी झाली होती आणि आता वर्षभराने त्याचा निकाल झाला आहे. या परीक्षेमध्ये दोन पेपर असतात. एक पेपर हा 1-5वीच्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापनाचा असतो तर दुसरा 6-8वीच्या विद्यार्थ्यांसाठी असतो. या दोन्ही परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. पण उत्तीर्ण होणार्यांचे प्रमाण नगण्य आहे.
टीईटी परीक्षेमध्ये पहिल्या पेपरला 2 लाख 54 हजार 428 विद्यार्थी सामोरे गेले होते त्यापैकी अवघे 967 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर दुसऱ्या पेपरसाठी गणित विज्ञान सहावी ते आठवी 64 हजार 647 विद्यार्थी सामोरे गेले होते त्यापैकी अवघे 937 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पेपर दुसरा सामाजिक शास्त्र सहावी ते आठवी विद्यार्थी 1 लाख 49 हजार 604 उमेदवार बसले होते. त्यापैकी सहा हजार सातशे अकरा उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.
जे उमेदवार ही परीक्षा क्वालिफाय करतात त्यांना MAHA TET pass certificate दिलं जातं. त्याच्या द्वारा विविध शाळांमध्ये शिक्षक पदासाठी अर्ज करु शकतात. ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जाणार्या या परीक्षेमध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी, बंगाली, उर्दू, गुजराती, तेलगू, सिंधी आणि कन्नड भाषेत परीक्षा देण्याची संधी विद्यार्थ्यांना असते.