Maha Awas Abhiyan Phase-2:  महाआवास अभियानच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ; 5 लाख लोकांना मिळणार त्यांचे स्वतःचे, हक्काचे घर
Hasan Mushrif | (File Image)

गोरगरीबांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम सरकारचे असून राज्यातील जनतेकरिता शासकीय अधिकाऱ्यांनी कमीत कमी वेळेत घरे बांधून ते स्वप्न पूर्ण करावे. या महाआवास अभियानामुळे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना स्वत:च्या मालकीचे पक्के घर मिळणार आहे. महाआवास अभियानाच्या पहिल्या टप्प्यात मिळालेले यश पाहता महाआवास अभियान टप्पा-2 मध्ये 5 लाख घरे बांधण्याचे माझे उद्दिष्ट असून ते पूर्ण करण्याचा आज संकल्प करून महाराष्ट्र राज्य अन्य राज्याच्या तुलनेत अधिक सक्षमपणे आणि गतिमानतेने पुढे नेऊ, असा निर्धार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केला.

महाआवास अभियान- ग्रामीण टप्पा-2 चा शुभारंभ आज मंत्रीमहोदय मुश्रीफ यांच्या हस्ते आज मंत्रालयातून करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात मुश्रीफ म्हणाले की, राज्यातील ग्रामीण भागात ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून विविध ग्रामीण आवास योजनांमधून शासन बेघरांना सर्व सुविधांनी युक्त असा हक्काचा निवारा पुरविण्यात यशस्वी होत आहे. याचाच भाग म्हणून दिनांक 20 नोव्हेंबर 2020 ते 5 जून 2021 या कालावधीत राबविलेल्या महा आवास अभियान – ग्रामीण (टप्पा-1) मध्ये 1260 पेक्षा जास्त बहुमजली इमारती, 630 पेक्षा जास्त गृहसंकुले तसेच 750 घरकुल मार्ट सुरू करण्यात आले आहे. याचबरोबर 50 हजार 112 भूमीहिन लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. (हेही वाचा: लसीचा एकही डोस न घेतलेल्या रिक्षा चालकांच्या गाड्या होणार जप्त; औरंगाबाद प्रशासनाचा मोठा निर्णय)

या टप्पा-1 मध्ये आपण 4 लाख 25 हजार घरकुले भौतिकदृष्ट्या बांधून पूर्ण केली असून उर्वरित घरकुले तात्काळ पूर्ण करण्यात येणार आहे. महाआवास अभियान टप्पा-2 हा 20 नोव्हेंबर 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत असून हे अभियान अधिक गतिमानतेने आणि गुणवत्तेने राबविण्यात येणार असल्याचे मंत्रीमहोदयांनी सांगितले. बेघर व्यक्तींना घरे देण्यात काही अडचणी येत असेल, त्यांच्या घरांकरिता रेती, वाळू, आदी साहित्य मिळण्यास अडचणी निर्माण होत असतील, तर त्या शासन स्तरावर तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. या घरांकरिता काही रक्कम केंद्र सरकारकडून मिळत असून ती रक्कम मिळण्यास अडचणी असल्यास त्याही प्राधान्याने सोडविल्या जातील. यावेळी राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माणच्या महाआवास हेल्पलाईन 1800 22 2019 या टोल फ्री क्रमांकही सगळ्यांसाठी खुला करण्यात आला.