Sanjay Raut (Pic Credit - ANI)

केंद्र सरकारने लाऊडस्पीकरच्या वापराबाबत राष्ट्रीय धोरण आणावे आणि आधी भाजपशासित राज्यांमध्ये त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी बुधवारी केली. या महिन्याच्या सुरुवातीला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मशिदींतील लाऊडस्पीकर काढून टाकण्याची मागणी केल्यानंतर लाऊडस्पीकरचा वापर हा देशात चर्चेचा मुद्दा बनला आहे. आज पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘सध्या हिंदुत्वाच्या नावावर राजकीय भोंग्यांचा वाढ सुरु आहे ते एक ढोंग आहे आणि ते फार काळ चालणार नाही. मात्र यामुळे हिंदू बदनाम होत आहेत.’

ते पुढे म्हणाले, ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन करतो की त्यांनी लाऊडस्पीकरच्या वापराबाबत राष्ट्रीय धोरण तयार करावे आणि ते आधी बिहार, दिल्ली आणि गुजरात या राज्यांमध्ये लागू करावे.’ त्यानंतर महाराष्ट्रदेखील या कायद्याचे पालन आपोआपच करेल, असेही ते म्हणाले. ‘तुमच्या लोकांनी लाऊडस्पीकरच्या वापरावरून वाद निर्माण केला आहे, त्यामुळे राष्ट्रीय धोरणाची गरज आहे,’ असे टीकास्त्र त्यांनी भाजपवर सोडले. (हेही वाचा: राज ठाकरे यांच्या धमकीचा परिणाम; मुंबईमध्ये 72 टक्के मशिदींनी कमी केला लाऊडस्पीकरचा आवाज)

यासोबतच गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये अद्याप लाऊडस्पीकर काढण्यात आलेले नाहीत, असे राज्यसभा सदस्य राऊत यांनी सांगितले. केंद्र सरकारने गोहत्येवर बंदी घालण्याचे धोरण तयार केले, परंतु त्यामध्ये ईशान्येकडील राज्ये आणि गोव्याला सूट दिली, कारण या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी गोहत्या बंदीला विरोध केला होता. ‘यावेळी राष्ट्रीय धोरण कोठे आहे?; असा प्रश्नही राऊत यांनी केला.  लाऊडस्पीकरबाबत राष्ट्रीय धोरण तयार करा आणि हिंमत असेल तर त्याची काटेकोर अंमलबजावणी गुजरात, दिल्ली आणि बिहारपासून सुरु करा, अशी मागणी राऊत यांनी केली.

ते पुढे म्हणाले, ‘भाजपला आत्ता जाग आली आहे, त्यांची झोप आत्ता उडाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांची मशिदींवरील भोंग्यांच्या संदर्भातील भूमिका आपल्याला जाहीरपणे माहिती आहे. त्यानंतर त्यावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आणि तेव्हापासून महाराष्ट्रात कारवाई सुरू आहे. आम्हाला भोंग्यांच्या संदर्भात कुणाकडून अक्कल शिकण्याची गरज नाही. शिवसेना प्रमुखांनी मुस्लिमांच्यासंदर्भातील अनेक प्रश्न चर्चेमधून सोडवले होते.’