कोरोनाकडे संकट म्हणून नव्हे व्यावसायिक विकासाची संधी म्हणून बघा; हसन मुश्रीफ यांचे महिला बचतगटांना आवाहन
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (PC - Twitter)

महिलांनी बचतगटांच्या माध्यमातून तयार केलेले साहित्य व उत्पादनास ॲमेझॉनद्वारे जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचे काम ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. कोरोना काळात ऑनलाईन खरेदीस चालना मिळाली आहे. त्या अनुषंगाने कोरोना संकटामुळे निर्माण झालेली स्थिती ही अर्थार्जनाच्या संधीत परावर्तित करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्फे आयोजित ऑनलाइन महिला मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यात राज्यभरातून जवळपास एक लाख महिला सहभागी झाल्या. ‘उमेद’ अभियानातील स्वयंसहायता गटांनी कोरोना संकटकाळात जागतिक बाजारपेठेत तग धरण्याच्या दृष्टीने स्वतःच्या व्यवसायामध्ये आमूलाग्र बदल करावा. कोरोनाकडे संकट म्हणून न बघता या काळात व्यावसायिक विकास करण्याची संधी म्हणून बघावे, असे आवाहनदेखील मुश्रीफ यांनी केलं आहे. (हेही वाचा - Police Pre-Recruitment Training: अल्पसंख्याक तरुणांना मिळणार पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण; नवाब मलिक यांची माहिती)

दरम्यान, 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत ग्रामीण भागात मासिक पाळीविषयक जनजागृतीसाठी ‘जागर अस्मितेचा’ मोहिम राबविण्यात येणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त बचतगटांनी सहभागी होऊन ‘अस्मिता प्लस’ सॅनिटरी नॅपकिन विक्री करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही मुश्रीफ यांनी केले आहे.

‘एक ग्रामपंचायत एक बीसी सखी’ उपक्रमाला अधिक गती मिळण्याकरीता याच कालावधीत ‘उमेद महिला सक्षमीकरण - बीसी सखी तसेच डिजी पे सखी अभियान’ राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतून ग्रामस्थांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा व अटल पेन्शन योजना या सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे. या अभियानास यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी बीसी सखी म्हणून काम करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुश्रीफ यांनी केलं आहे.