Coronavirus | Photo Credits: Twitter/ ANI

महाराष्ट्रात (Maharashtra) अटोक्यात आलेल्या कोरोनाने (Coronavirus) पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. राज्यात विविध शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. यातच मीरा-भाईंदरवासीयांसाठी (Mira Bhayandar) अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदरमध्ये लंडनसारखा फॉर्म्युला वापरत कोरोनाबाबतचे निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून आता मोठा दंड आकारला जाणार आहे.

मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त दिलीप ढोले यांनी पदभार स्वीकारताच आदेश काढला आहे. दरम्यान, एखादी संस्था, कार्यालय, मॉल किंवा खाजगी कंपन्या कोरोना नियमांचे उल्लघंन करत असतील त्यांना 25 हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे. यानंतर दुसऱ्यांदाही तोच गुन्हा केल्याचे आढळल्यास सदर संस्था, कार्यालये, मॉल, खाजगी कंपन्या सरळ सरळ सात दिवसांसाठी सील केल्या जातील, असे दिलीप ढोले यांनी म्हटले आहे. सरकारने ठरवून दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून 500 रुपयांचा दंड आकारला जाणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. यासाठी महानगरपालिका आणि पोलीस एकत्रित काम करणार आहेत. हे देखील वाचा- Coronavirus in Mumbai: मुंबईत आजही कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ कायम! 1121 नवे कोविड-19 रुग्ण तर 6 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. राज्यात काल (3 मार्च) 9 हजार 855 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 6 हजार 559 कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात एकूण 20 लाख 43 हजार 349 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 82 हजार 343 रुग्ण सक्रिय आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.77% झाले आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.