Loksabha Election 2024: वंचित आघाडीचा शाहू महाराज यांना पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांची घोषणा

प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडीने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये (Loksabha Election) शाहू छत्रपती यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शाहू महाराजांना काँग्रेसने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. एकीकडे महाविकास आघाडी आणि वंचितच्या युतीचा तिढा अद्दाप सुटलेला नाही. अशातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत कोल्हापूरमध्ये (Kolhapur) शाहू महाराज छत्रपती यांना वंचितचा पाठिंबा देणार असल्याची घोषणा केली. दरम्यान प्रकाश आंबेडकरांच्या घोषणानंतर शाहू महाराज छत्रपती यांनी आंबेडकरांचे आभार मानले आहे.  (हेही वाचा - Shivajirao Adhalrao Patil: शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश निश्चित, शिरुरमधून निवडणूक लढवणार)

महाविकास आघाडीची वंचित बहुजन आघाडीसोबत बोलणी सुरुच आहे. त्यापूर्वीच आता प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूरमध्ये शाहू छत्रपतींना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. शनिवारी दुपारी 4 वाजता आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आंबेडकर बोलत होते. प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, काँग्रेसने ज्या सात जागा जाहीर केल्या आहेत,त्या त्यांनी आम्हाला सांगाव्यात. आम्ही त्यांना इतर जागांवर पाठिंबा देणार नाही. येत्या 26 तारखेला आम्ही आमची भूमिका जाहीर करणार आहोत.

''वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपल्याला पाठिंबा जाहीर केल्याचे मला आत्ताच कळालं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांचे संबंध हे किती जिव्हाळ्याचे होते हे सगळ्यांनाच माहिती आहे. हा दृष्टिकोन ठेवूनच त्यांनी मला हा पाठिंबा दिला असेल असं मला वाटतं.'' अशा शब्दात शाहू छत्रपतींनी आंबेडकरांचे आभार मानले.