Loksabha Election 2024

Loksabha Election 2024: एका दिव्यांग व्यक्तिच्या (Disabled Person) मतदानासाठी निवडणूक यंत्रणा चंद्रपूरच्या (Chandrapur) दुर्गम गावात पोहोचली आहे. गृह मतदानाच्या माध्यमातून या व्यक्तीने आपले मत नोंदवले. राज्याच्या टोकारील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यामधील महाराजगुडा गावात ही घटना घडली. हे दुर्गम गाव महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवर आहे. या गावात एकूण 281 मतदार असून त्यातील एक दिव्यांग मतदार आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे.

याच अनुषंगाने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनात 8 ते 14 एप्रिल या कालावधीत गृह मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. याचा शुभारंभ सोमवारी (दि.8) अतिदुर्गम असलेल्या जीवती तालुक्यात झाला.

महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या महाराजगुडा येथील सुरेखा तुकाराम राठोड (वय 40) या एकमेव दिव्यांग असलेल्या महिलेने गृह मतदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार प्रशासनाने त्यांच्याकडून नमुना 12-डी भरून घेतला होता. सुरेखा यांचे गृह मतदान घेण्यासाठी सोमवारी (दि. 8) जीवती तालुक्यातील टीम क्रमांक 10, महाराजगुडा येथे सुरेखा यांच्या घरी पोहचली. गृह मतदानाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितल्यानंतर सुरेखा यांनी आपले मत नोंदविले. सुरेखा या पूर्णपणे दिव्यांग असून त्या एका क्षणासाठीदेखील उभ्या राहू शकत नाही. त्यामुळे त्यांनी आपले मत घरातच स्थापन केलेल्या मतदान कक्षात बसूनच नोंदविले आणि मतपत्रिका लिफाफ्यामध्ये टाकून अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. (हेही वाचा: Abki Baar 400 Par : 'अब की बार 400 पार'चं टार्गेट भाजप गाठणार कसं? चंद्रकांत पाटील यांनी सांगितला फॉर्म्युला)

यासेाबतच सदर टीमने राज्याच्या सीमेवरील नारपठार (विजयगुडा) येथील जमुनाबाई दुर्गे आत्राम (वय 90), संग्राम किसन कोरपल्लीवार (वय 89) आणि मुद्रीकाबाई संग्राम कोरपल्लीवार (85) या वयोवृध्द नागरिकांचेही गृहमतदानाद्वारे मत नोंदविले. गृह मतदान करतांना मतदान प्रक्रियेची गोपनीयता पाळण्याच्या सूचना भारत निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार फॉर्म 13 – ए (डिक्लरेशन), फॉर्म 13 – बी (कव्हर ए लिफाफा), फॉर्म 13 – सी (कव्हर बी लिफाफा) आणि फॉर्म 13 – डी (मतदान कसे करायचे याबाबत सुचना) आदी प्रक्रियेबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरवातीला मतदारांना माहिती दिली. यावेळी घरामध्ये स्थापन केलेल्या मतदान कक्षामध्ये सदर मतदारांनी आपले मत नोंदविले.