Lok Sabha Elections 2024: शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांची लोकसभेची उमेदवारी भर सभेत केली जाहीर
Sharad Pawar, Supriya Sule | (PC - Facebook)

लोकसभा निवडणूकीचं देशात वातावरण आहे. आता कधीही निवडणूकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षांनी उमेदवारी जाहीर करण्यास सुरूवात केली आहे. अशामध्ये भोर येथील मविआ च्या सभेमध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांनी बारामती (Baramati) लोकसभेसाठी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या नावाची घोषणा केली आहे. एनसीपी (NCP) मध्ये फूट पडल्यानंतर आणि महाविकास आघाडी म्हणून शरद पवारांसाठी ही पहिलीच निवडणूक आहे. अद्याप मविआ कडून जागावाटप जाहीर झाले नाही पण शनिवारी भोर मध्ये बोलताना त्यांनी सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

सुप्रिया सुळे यांची राजकीय कारकीर्द राज्यसभेतून सुरू झाली. 2009 झाली त्या पहिल्यांदा बारामती लोकसभा मतदार संघातून संसदेत निवडून गेल्या. आता पुन्हा त्या निवडणूकीला सज्ज झाल्या आहेत. एनसीपी मधील फूटीनंतर शरद पवार यांना पक्षाचं नवं नाव आणि तुतारी हे चिन्ह घेऊन निवडणूकांना सामोरं जायचं आहे. भोर मधील सभेत बोलताना त्यांनी निवडणूक आयोग 14,15 मार्च दरम्यान तारखा जाहीर करण्याची शक्यता असल्याचं म्हणाले आहेत.

मागील 20 वर्षांपासून राजकीय वैर असलेले अनंतराव थोपटे यांच्या घरी काल शरद पवार यांनी भेट दिली. तर सभेत बोलताना 'संग्राम थोपटे तुम्ही या तालुक्यासाठी, राज्यासाठी, देशासाठी जे काही कराल त्यासाठी मी तुमच्या मागे उभा आहे. या आधी आपले रस्ते वेगळे असतील किंवा नसतील, पण तुम्ही आमच्या सोबत रहा. शरद पवार पाठिशी असल्यावर विकास काय असतो हे मी तुम्हाला दाखवून देईन.' असेही ते म्हणाले.

बारामती मध्ये सुप्रिया सुळे यांच्या समोर सुनेत्रा पवार उमेदवार म्हणून उभ्या राहणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे खुद्द शरद पवार बारामती मध्ये लेकीच्या प्रचारासाठी ठिय्या मांडून बसले आहेत.