Lok Sabha Elections 2024: 'लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 4 ते 6 जागा मिळाल्या तरी पुरेसे'- CM Eknath Shinde
Eknath Shinde | (Photo Credit: Archived, edited, representative images)

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections 2024) सुमारे दीड वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पक्षांकडून विविध मार्गांनी प्रयत्न सुरू आहेत. एकीकडे सर्वच पक्ष निवडणुकीची तयारी करत असताना दुसरीकडे एका वृत्तवाहिनीच्या सर्वेक्षणातूनही समोर आले आहे की, आता जर लोकसभा निवडणुका झाल्या तर भाजपच्या जागा कमी होतील आणि यूपीएला बंपर फायदा होईल. या सर्वेक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 4 ते 6 जागा राखू शकली तरी ते पुरेसे आहे.’ इंडिया टुडे-सीव्होटरच्या सर्वेक्षणानुसार आता जर का लोकसभा निवडणूक झाल्यास महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला 34 जागा मिळू शकतात असे समोर आले आहे. राज्यात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत.

सध्या महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आहे, तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन केली आहे. पुढच्या वर्षी होणा-या लोकसभा निवडणुकांबाबत मीडिया हाऊसने नुकत्याच केलेल्या राजकीय सर्वेक्षणाच्या निकालांबद्दल शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘पुढील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी सर्व विक्रम मोडतील आणि एनडीए सत्तेत परत येईल. परंतु मोजक्या लोकांवर केलेल्या सर्वेक्षणात खरे चित्र समोर येत नाही. राजकारणात दोन अधिक दोन नेहमीच चार होत नाहीत.’ (हेही वाचा:  प्रकाश आंबेडकरांच्या 'त्या' वक्तव्यावर संजय राऊतांची नाराजी, म्हणाले - त्यांनी युतीचा भागीदार म्हणून युती धर्म पाळावा)

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा संदर्भ देत शिंदे म्हणाले की, ‘मुख्यमंत्री होण्यापूर्वीच्या अडीच वर्षांत ‘नकारात्मकतेचे सरकार’ सत्तेत होते. मात्र आता राज्यात सकारात्मकतेचे सरकार आहे. मागील सरकारच्या काळात राज्यात असंतोष होता, मात्र आपण अनेक विकासकामे सुरू करून राज्यातील संपूर्ण वातावरणच बदलून टाकले. आता मीही सांगू शकत नाही की कोण कोणाशी हातमिळवणी करेल आणि कोणाची युती तुटेल. पण बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप चांगले काम करत असून हे सर्वसामान्यांचे सरकार आहे.’