Lok Sabha Elections 2019: किरीट सोमय्या यांचा भाजप उमेदवार यादीतून पत्ता कट? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरील व्यक्तिगत टीका भोवल्याची चर्चा
kirit somaiya | (Photo Credit: kiritsomaiya.com)

Lok Sabha Elections 2019: ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ (Mumbai North East Lok Sabha constituency) हा गेली चार वर्षे अनेकदा चर्चेत आला. या मतदारसंघातील विद्यमान खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांनी केलेली विधाने, टीका हे या चर्चेमागचे कारण. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत किरीट सोमय्या यांचा पत्ता कट होणार अशी चर्चा आहे. भाजप (BJP) केंद्रीय नेतृत्वाने लोकसभा निवडणूक तिकीटासाठी नावांची शिफारस करण्याची सूचना राज्यातील नेत्यांना केली आहे. त्यानुसार राज्यातील नेत्यांनी संभाव्य उमेदवारीसाठी लोकसभा मतदारसंघ निहाय नावे पाठवली आहेत. त्यात ईशान्य मुंबई मतदारसंघाच्या नावाचाही समावेश आहे. मात्र, या मतदारसंघातून केंद्रीय नेतृत्वाने किरीट सोमय्या यांच्यासोबत आणखी एका नावाची शिफारस करण्यात यावी अशी सूचना केली आहे. प्रसारमाध्यमांतून हे वृत्त झळकताच सोमय्या यांची उमेदवारी धोक्यात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

किरीट सोमय्या यांनी गेल्या साडेचार वर्षात मित्रपक्ष शिवसेनेवर सातत्याने टीका केली होती. सोमय्या यांच्या टीकेची धारही अनेकदा तीव्र स्वरुपाची राहीली होती. सोमय्या यांनी केवळ शिवसेनाच नव्हे तर, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही थेट टीका केली होती. त्यामुळे शिवसेना नेत्यांसोबतच कट्टर शिवसैनिक प्रचंड दुखावला होता. त्यामुळे लोकसभा निवडणूक 2019 साठी जरी शिवसेना-भाजप युती झाली असली तरीसुद्ध ईशान्य मुंबई मतदारसंघातील शिवसैनिक भाजपला मतदान करेनच असे खात्रीलायक सांगता येणार नाही, असा दोन्ही पक्षातील नेत्यांचा होरा आहे. त्यातच शिवसेना नेतृत्वही सोमय्या यांच्याविषयी कमालीचे नाराज आहे. त्यामुळे सोमय्या यांच्या नावावर भाजप नेतृत्व फूली मारू शकते, अशी चर्चा आहे. तर, राज्यातील राजकीय वर्तुळात सोमय्यांना 'मातोश्री'वरील टीका भोवली अशी चर्चा सुरु झाली आहे. (हेही वाचा, Lok Sabha Election 2019: काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर)

दरम्यान, किरीट सोमय्या यांच्यावर शिवसेना नेतृत्वाची खप्पामर्जी असल्याचे भाजप नेतृत्वाला चांगेच ठाऊक असावे. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीची घोषणा होत असताना किरीट सोमय्या पहिल्या रांगेत बसले होते. मात्र, पत्रकार परिषद सुरु झाल्यावर काही वेळातच सोमय्यांना सूचक इशारा मिळाला. त्यानंतर सोमय्या यांनी पत्रकार परिषद सोडून बाहेर पडणे पसंद केले. प्राप्त माहितीनुसार भाजपकडून तिकीटासठी मंजूर झालेल्या 16 उमेदवारांच्या यादीत सोमय्या यांचे नाव नाही.