Election Commission (Photo Credits-Twitter)

लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections) चा निकाल यंदा 23 मे रोजी लागणार आहे. महाराष्ट्रात 48 जागांवर झालेल्या निवडणूकीचे आता उमेदवारांसह मतदारांनाही वेध लागले आहेत. 23 मे दिवशी गडचिरोली (Gadchiroli) या मतदारसंघाचा निकाल सर्वप्रथम लागण्याची शक्यता आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत गडचिरोलीमधील 5 लोकसभा उमेदवारांचे ट्रेंड्स समजणार आहेत तर राज्यातील उर्वरित भागातील उमेदवारांचे ट्रेंड्स दुपारी 2 वाजेपर्यंत समजणार आहेत. Lok Sabha Elections 2019: महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप उमेदवार संपूर्ण यादी

गडचिरोलीमध्ये 5, सातारामध्ये 9, लातूर 10, नंदूरबार 11 आणि पालघर व रत्नागिरी येथे 12 उमेदवार असल्याने लोकसभा निवडणूकीचे या मतदारसंघातील निकाल लवकर लागण्याची शक्यता आहे. बीड मध्ये 36 जण निवडणूकीच्या रिंगणात असल्याने या भागामध्ये निकाल लावण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो. महाराष्ट्रात चार टप्प्यात झालेल्या लोकसभा निवडणूक 2019 दरम्यान 60.67 % मतदान झालं होतं.

देशभरात ज्या ज्या मतदारसंघामध्ये अवघे 5-6 उमेदावार निवडणूकीच्या रिंगणात आहेत तेथे लोकसभा निवडणूक निकाल दुपारी 1 वाजेपर्यंत लागण्याची शक्यता आहे. अंतिम निकाल लागण्यासाठी यंदा थोडा अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. कारण ईव्हीएम सोबतच यंदा व्हीव्हीपॅट मशिनमधील स्लिप्सची देखील मोजणी करायची आहे. अशी माहिती निवडणूक आयुक्त अश्विनीकुमार यांनी दिली आहे.

23 मे दिवशी लोकसभा निवडणूक निकालासाठी देशभरात सज्ज आहे. सुमारे लाखभर कर्मचारी 96 तास मतमोजणीच्या कामात रूजू असतील. गडचिरोली हा नक्षलग्रस्त भाग असल्याने तेथे विशेष पोलिसव्यवस्था तैनात केलेली असेल. नुकत्याच झालेल्या नक्षलवादी हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याचे आव्हान आहे.