Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीआधी सत्ताधारी नेत्यांच्या 13 साखर कारखान्यांना 1,898 कोटींचं कर्ज
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

लोकसभा निवडणुकीत ऊस उत्पादक शेतकरी आणि स्वपक्षीय साखरसम्राट आमदारांच्या नाराजीचा फटका बसू नये यासाठी महायुती आघाडी सरकारने भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या 13 साखर कारखान्यांना 1898 कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे 5, राष्ट्रवादीचे 7 आणि 1 कारखाना काँग्रेस आमदारांशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. भोर-वेल्हा मतदार संघाचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांना खूश करण्यासाठी त्यांच्या राजगड साखर कारखान्यास 80 कोटी रुपयांची कर्जहमी देण्यात आली आहे. आचारसंहितेआधी मंत्रिमंडळ उपसमितीकडून कर्जहमीच्या या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. (हेही वाचा - Raj Thackeray and BJP: 'धनुष्यबाण' झाला, घड्याळ आले, तरीही 'कमळ' 'इंजिन'मागे धावले? महायुतीत असे का व्हावे?)

राज्य सरकार स्वत:च्या जबाबदारीवर राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून हे कर्ज घेऊन ते कारखान्यांना देणार असून त्याबाबतच्या प्रस्तावास दोनच दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ उपसमितीने मान्यता दिली. महत्त्वाचं म्हणजे आचारसंहिता लागू होण्याच्या आधी मंत्रीमंडळ उपसमितीने या प्रस्तावाला मान्यता दिल्याचं समोर आलं आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांना खूश करण्यासाठी त्यांच्या राजगड साखर कारखान्यास (भोर) 80 कोटी रुपयांची कर्जहमी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटातील काही आमदारांच्या कारखान्यांना ही मदत नाकारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

अजित पवार गट

●लोकनेते सुंदररावजी सोळंके साखर कारखाना (बीड) 104 कोटी

●किसनवीर (सातारा) 350 कोटी

●किसनवीर (खंडाळा) 150 कोटी

●लोकनेते मारोतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखाना(नेवासा) 150 कोटी

●अगस्ती (अहमदनगर) 100 कोटी

●अंबाजोगाई (बीड) 80 कोटी

●शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदा) 110 कोटी

भाजपशी संबंधित

●संत दामाजी(मंगळवेढा)100 कोटी,

●वृद्धेश्वर (पाथर्डी) 99 कोटी

●सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे (कोपरगाव) 125 कोटी

●तात्यासाहेब कोरे वारणानगर (कोल्हापूर) 350 कोटी

●बसवराज पाटील यांचा विठ्ठलसाई (धाराशिव) 100 कोटी