Lok Sabha Election 2024: रश्मी बर्वे यांना दिलासा नाहीच; निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्ट ने दिला नकार
Rashmi Barve | Twitter

महाविकास आघाडीच्या रामटेक (Ramtek) च्या उमेदवार रश्मी बर्वे (Rashmi Barve)  यांना जात पडताळणी प्रकरणी अपात्र ठरवत त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती. या विरूद्ध रश्मी बर्वे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court Of India) धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार देत रश्मी बर्वे यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता रश्मी बर्वे यांच्या जागी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे कॉंग्रेसचे उमेदवार असणार आहेत. 19 एप्रिलला रामटेक मध्ये निवडणूक होणार असून या निवडणूकीत उमेदवार म्हणून सहभागी होता व्हावं अशी मागणी याचिकेतून रश्मी बर्वे यांनी केली होती पण त्यांना दिलासा मिळालेला नाही.

रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द केल्याच्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली. खोटे कागदपत्र लावल्यामुळे काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द ठरवले होते. जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडून प्रमाणपत्र रद्द झाल्याने रश्मी बर्वे यांचा लोकसभा निवडणूकीची उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकालाला स्थगिती दिली असल्याने निवडणूकीच्या तारखेपूर्वी त्यांच्याकडून या याचिकेवर निर्णय होणार नसल्याने रश्मी बर्वे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्या होत्या पण तेथेही याचिका फेटाळल्याने आता त्यांची उमेदवारी रद्दच राहणार आहे.   श्यामकुमार बर्वे यांच्या विरूद्ध शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे आणि  वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किशोर गजभिये यांचं आव्हान असणार आहे.

भारतामध्ये लोकसभा निवडणूकीसाठी 19 एप्रिल पासून 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 1 जूनला मतदानाचा शेवटचा टप्पा असून 4 जूनला निकाल जाहीर केला जाणार आहे.