राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन (Lockdown) लागण्याची शक्यता वर्तवली जात होती, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या लॉकडाऊन नियोजनच्या निर्देशानंतर ही शक्यता अधिकच दाट झाली. मात्र महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसने लॉकडाऊन लागू करण्यास विरोध दर्शवला आहे. लॉकडाऊन हा अंतिम पर्याय असू शकत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी म्हटले आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या मुद्द्यावर सरकारमध्येच मतमतांतर असल्याचे दिसून येते.
"राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मात्र लॉकडाऊन राज्याला व जनतेला परवडणारा नाही. त्यामुळे तो अंतिम पर्याय असू शकत नाही. त्याऐवजी आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर द्यावा," असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. आरोग्यसेवा वाढवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या असून नागरिकांनी काळजी घेणं आणि नियमांचे पालन करणे ही महत्त्वाचे असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. नियम पाळल्यास कोरोनाचा प्रसार टाळता येईल, असेही ते म्हणाले. (Anand Mahindra यांनी लॉकडाऊनच्या मुद्द्यावर ठाकरे सरकारला दिला 'हा' महत्त्वपूर्ण सल्ला)
ANI Tweet:
We can't afford lockdown. We've asked CM to consider other options. Due to rising cases, he has directed administration to prepare for lockdown but that doesn't mean that lockdown is inevitable. If people follow rules, it can be avoided: Maharashtra Min & NCP leader Nawab Malik pic.twitter.com/Hbkq0ZITAB
— ANI (@ANI) March 29, 2021
लॉकडाऊनच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश काल मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानंतर सर्वच स्तरातून त्यावर प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. भाजपने देखील लॉकडाऊनला विरोध केला आहे. त्याचबरोबर महिंद्रा अॅण्ड महिंद्रा (Mahindra and Mahindra) उद्योग समूहाचे आनंद महिंद्रा यांनी देखील ट्विट करत लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. त्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारमधील एका पक्षाने लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे.
दरम्यान, आज राज्यात 31,643 नवे रुग्ण आढळून आले असून 102 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20.854 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.