महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूचे (Coronavirus) जाळे वेगाने पसरवू लागले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील अनेक राज्यातील लॉकडाउन (Lockdown) 31 एप्रिलपर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, लॉकडाउनच्या काळात काही नागरिक रस्त्यात अडकून पडले आहेत. तसेच आपल्या घरी किंवा गावाकडे परतण्यासाठी अनेकजण धोकादायक मार्ग निवडत आहेत. यातच कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर शहरांमध्ये अडकून पडलेल्या लोकांनी गावांकडे स्थलांतर करु नये, त्यांची सर्व व्यवस्था केली जाईल, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले आहे. कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, काही गावात इतर शहरातून परतलेल्या लोकांना प्रवेश दिला जात नाही, अशाही नागरिकांना देशमुख यांनी प्रसारमाध्यामातून जिथे आहात तिथेच थांबण्याची विनंती केली आहे.
कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 16 लाखांहून अधिक लोक कोरोनाबाधीत झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. तसेच 170 हून अधिक देश कोरोना विषाणूशी झुंज देत आहेत. महाराष्ट्रात करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे 30 एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. यामुळे रस्त्यात अडकून पडलेल्या लोकांची घरी परतण्याची आशा आता भंग झाली आहे. यातच अनिल देशमुख यांनी शहारात अडकून पडलेल्या जनतेशी संवाद साधला आहे. दरम्यान ते म्हणाले की, “करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात लॉकडाउनचा कार्यकाळ वाढवावा लागला आहे. त्यामुळे या कठीण परिस्थितीमध्ये कष्टकरी, स्थलांतरीत मजुरांनी गावाकडे परतण्याचा प्रयत्न करु नये, त्यांनी आहे तिथेच रहावे. शासनाच्यावतीने सर्वांची राहण्याची सोय, पुरेसे अन्न देण्याची आम्ही हमी देतो. केवळ आपले राज्य, देश नव्हेतर, संपूर्ण जगावर सध्या करोनाचे संकट आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत जर कोणी गावी परतण्याचा प्रयत्न केला तर, कदाचित त्यांना वाटेतच अडविले जाईल. इतकी पायपीट करुन गावात जाऊनही जर गावातील लोकांनी प्रवेश दिला नाही तर, आपल्यावर अधिक कठीण प्रसंग ओढवू शकतो. त्याचबरोबर करोनाच्या साथीला बळी पडण्याचा धोकाही वाढेल”, असेही अनिल देशमुख म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Coronavirus: नागपूर येथे कोरोनाचे आणखी 14 नवे रुग्ण आढळले; महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांची माहिती
ट्वीट-
#coronavirus च्या वाढत्या संसर्गामुळे #Lockdown चा कार्यकाळ वाढवावा लागला. अशा कठीण परिस्थितीमध्ये कष्टकरी, स्थलांतरित मजुरांनी गावाकडे परतण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी आहे तेथेच रहावे. शासनाच्या वतीने सर्वांची राहण्याची सोय, पुरेसे अन्न देण्याची हमी- गृहमंत्री @AnilDeshmukhNCP pic.twitter.com/PoSDCRKBWu
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 12, 2020
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.