महाराष्ट्रात कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत ही स्थिती आटोक्यात आली असून काही भागात अजूनही लोकांना सोशल डिस्टंसिंगचे गांभीर्य न कळल्यामुळे येथील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पनवेल (Panvel) जिल्ह्यात आजपासून पुन्हा कडक लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. 31 जुलै मध्यरात्री 12 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन सुरु राहील असे आयुक्त सुधाकर देशमुख (Sudhakar Deshmukh) यांनी सांगितले आहे. त्यानुसार 22 जुलैला सकाळी 5 वाजल्यापासून ‘मिशन बिगीन अगेन’ (Mission Begin Again) सुरु होईल, तर क्लस्टर कंटेन्मेंट झोन आणि इतर कंटेन्मेंट झोनमध्ये 31 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लॉकडाऊन सुरु राहील.
पनवेल मध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत चालल्यामुळे हा निर्णय गेण्यात आला आहे. पनवेलमध्ये 3 जुलैपासून सुरु झालेला लॉकडाऊन सलग तिस-यांदा वाढविण्यात आला आहे. यासाठी काही महत्त्वाचे नियम घालण्यात आले आहेत.
1. कंटेन्मेंट क्षेत्राव्यतिरिक्त संपूर्ण शहरामध्ये राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे ‘मिशन बिगीन अगेन’ सुरु राहील. नवी मुंबईत कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी येत्या 31 जुलै पर्यंत लॉकडाऊन, अन्य ठिकाणी व्यवहार सम-विषम तारखेनुसार सुरु राहणार
2. मॉल्स, मार्केट आणि कॉम्प्लेक्स वगळता सर्व भाजी मार्केटसह बाजारपेठा आणि दुकाने सम-विषम तत्वावर चालवण्यास परवानगी असेल.
3. दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत उघडी राहतील. P-1 व P-2 हे संबंधित प्रभागाचे प्रभाग अधिकारी किंवा इन्सीडंट कमांडर ठरवतील
4. एपीएमसी मार्केट आणि मासळी बाजार मात्र बंद राहील.
त्यामुळे सहकार्य करुन येथील लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे. महाराष्ट्रात सद्य घडीला कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या 3 लाख 18 हजार 695 वर पोहचली आहे. यापैकी 1 लाख 75 हजार 29 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 1 लाख 31 हजार 334 जणांवर उपचार सुरु आहे.