महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा विळखा अधिक घट्ट होताना दिसून येत आहे. तर राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि औरंगाबाद हे कोरोनाचे मुख्य हॉटस्पॉट बनले आहेत. या ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांची झपाट्याने वाढत होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहेत. याच दरम्यान आता नवी मुंबईत ही येत्या 31 जुलै पर्यंत कोरोनाच्या 42 हॉटस्पॉट ठिकाणी लॉकडाऊनचे आदेश स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. तसेच नवी मुंबईत अन्य विभागांमध्ये व्यवहार हे सम-विषम तारखेनुसार सुरु राहणार असल्याचे ही महापालिकेने म्हटले आहे.

नवी मुंबईत सध्या कोरोनाचे 11 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसागणिक नवी मुंबईत रुग्णांची भर पडत असली तरीही नागरिकांकडून काही गोष्टींच्या बाबत हलगर्जीपणा केला जात असल्याचे दिसून आले आहे. याच कारणास्तव कोरोनाचा आणखी प्रादुर्भाव पसरु नये म्हणून महापालिकेकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यूदर हा 2.79 टक्के असल्याची माहिती देण्यात आली आहे.(Thane: ठाण्यात Deputy Collector सह तिघांना कोरोना विषाणूची लागण; कलेक्टर ऑफिसमधील संक्रमितांची संख्या 18 च्या वर)

याच दरम्यान महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कोरोनाच्या संकटकाळात महापालिकेचे कर्मचारी संपूर्ण आठवडा काम करणार असल्याचे निर्देशन दिले आहे. तसेच सरकारी सुट्ट्यांसह सप्ताहिक सुट्टी सुद्धा कर्मचाऱ्यांची रद्द केली जाणार असल्याचे परिपत्रक जाहीर केले आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्णांसाठी आखणी 4100 बेड्सची उपलब्धता करुन देण्यात येणार आहे. महापालिकेकडून 1000 ऑक्सिजन बेड्स आणि 100 आयसीयु बेड्स हे सिडको एक्झिबिशन सेंटर वाशी येथे उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. तर इंडिया बुल्स क्वारंटाइन सेंटर जे पनवेल येथे आहे तेथे ही अतिरिक्त 3 हजार बेड्स उपलब्ध केले जाणार अल्याचे बांगर यांनी म्हटले आहे.