Shirdi Sai Baba Temple: कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी काही दिवसांपूर्वी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर साई मंदिरात (Sai Baba Temple) हार, फुलं आणि प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात आली होती. परंतु, आता देशात कोरोनाचा प्रसार कमी झाला आहे. त्यामुळे देशातील अनेक मंदिरांनी ही बंदी मागे घेतलेली आहे. मात्र, शिर्डी येथील साई संस्थानने मात्र मंदिरात हार, फुलं आणि प्रसाद नेण्यावरील बंदी कायम ठेवली आहे. परिणामी याविरोधात आता स्थानिक फूल विक्रेते आणि ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी याविरोधात शुक्रवारी आंदोलन केलं.
शिर्डी येथील ग्रामस्थांनी आणि विक्रेत्यांनी दर्शनाच्या रांगेत उभं राहून आंदोलन करत घोषणाबाजी केली. त्यांनी मंदिरात फुलं, हार नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, यासर्वांना मंदिरातील सुरक्षारक्षकांनी थांबवलं. यावेळी सुरक्षारक्षक आणि विक्रेत्यांमध्ये झटापट झाली. यामुळे साई मंदिर परिसरातील वातावरण बिघडलं. (हेही वाचा -Divyang Park: नागपूरात होणार महाराष्ट्राचा पहिला 'दिव्यांग पार्क'; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा)
दरम्यान, अहमनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, 'हा बऱ्याच दिवसांचा प्रश्न असून, सर्वांच्या भावना, भूमिका जाणून घेण्याची गरज आहे. सर्वांच्या भावनांचा मान राखत सुवर्णमध्य काढण्याची गरज आहे. पण याप्रकरणी साई संस्थान विश्वस्त मंडळाने लोकप्रतिनिधींशी कोणतीही चर्चा केलेली नाही. जेव्हा अशाप्रकारे लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता निर्णय घेतला जातो, तेव्हा असे परिणाम दिसतात. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात विश्वस्त मंडळाची नेमणूक झाली. तेथील अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असले तरी राजकारण न करता त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करणं आवश्यक आहे. मात्र, त्यांना विश्वासात न घेता निर्णय घेणं हे चुकिचं आहे.