Borrower | Representational Image. (Photo Credits: Pixabay)

मोबाईल अॅपच्या (Loan App Menace) माध्यमातून कर्ज देणाऱ्या आणि ते अत्यंत अमानुष पद्धतीने वसूल करण्याच्या पद्धतीचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे. नवी मुंबईत अशाच प्रकारची एक घटना घडली आहे. कर्ज वसुली एजंटच्या सततच्या छळाला कंटाळून नवी मुंबईतील (Navi Mumbai) तळोजा (Taloja) परिसरातील एक 34 वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाला आहे. कर्जदार असलेली ही व्यक्ती बेपत्ता झाल्यानंतर कर्जवसुली एजंटकडून त्याच्या कुटुंबीयांना नाहक त्रास दिला जातो आहे.

धक्कादायक म्हणजे कर्ज वसुली एजंटकडून कर्जदार व्यक्तीचा फोटो मॉर्फ करुन चुकीच्या पद्धतीने वापरला जात आहे. दुसऱ्या बाजूला कर्जदार व्यक्तीच्या आई आणि बहिणीला बलात्काराच्या धमक्या दिल्या जात आहेत. याशिवाय आपण वेश्या व्यवसाय (Paid Sex) सुरु करा म्हणजे आपल्याकडे पैसे येतील. त्यातून मग आपण कर्ज फेडा असेही सूचवले जात आहे.

कर्जदार सुहास जगदाळे हे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असत. पाठीमागील काही दिवसांपासून ते नाराज होते. त्यानंतर शुक्रवारी (25 जुन) रोजी ते बेपत्ता झाले. बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी आपण मोबाईल च्या माध्यमातून एक अॅप डाऊनलोड केले होते. हे अॅप ओपन करताना आपण विविध गोष्टींवर क्लिक करत गेलो. त्यानंतर काही दिवसांनी आपल्याला कर्जाचे हप्ते भरण्यासाठी फोन येऊ लागल्याने आपण नाराज असल्याचे सुहास यांनी म्हटल्याचे त्यांच्या बहिनीने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान, त्यानंतर दोन दिवसांमध्ये परत येतो असे सांगून तो घरातून शनिवारी निघून गेला. त्यानंतर तो अद्याप परत आलाच नाही. त्यामुळे आपण तळोजा पोलिसांत तक्रार दिली असल्याचे म्हटले आहे.

सुहास जगदाळे यांच्या बहिणीने दावा केला आहे की, कर्जवसुली एजंट्सनी जगदाळे यांचा मॉर्फ केलेला फोटो नातेवाईकांना पाठवले आहेत. याशिवाय तो पुरुषांशी पैसे घेऊन सेक्स करण्यास तयार असल्याचेही काही मेसेज नातेवाईकांना पाठवले गेले आहेत. या मेसेजखाली सुहास यांचा फोन क्रमांक आहे. कर्जवसुली एजंट जबरदस्तीने सांगत आहेत की, सुहास यांनी जर ते कर्ज फेडले नाही तर त्याच्या कुटुंबीयांना हे कर्ज भरावे लागेल.