Liquor Party at Shiv Sena's Chembur Office

मुंबईतील चेंबूर (Chembur) येथील शिवसेनेच्या कार्यालयात (Shiv Sena Office) दारू पार्टी सुरू असल्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असून, वादही निर्माण झाला आहे. शिवसेना (यूबीटी) नेते सुनील प्रभू यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पक्ष कार्यालये शिवसैनिकांसाठी मंदिरांसारखी असतात आणि तेथे अशा प्रकारच्या पार्ट्या आयोजित केल्याने सत्ताधारी गटाचा खरा चेहरा उघड होतो. शिवसेना यूबीटीने व्हायरल व्हिडिओ त्यांच्या एक्स वरील अधिकृत अकाउंटवर पोस्ट केला आणि त्याला ‘निर्लज्जतेची हद्द’ असे संबोधले.

यूबीटी गटाने शिंदे सेनेवर पक्ष कार्यालयांमध्ये दारूच्या पार्ट्या आयोजित केल्याचा आरोप केला. प्रतिस्पर्धी गटावर हल्ला चढवत यूबीटी सेनेने लिहिले की, ‘मिंधेंच्या शाखेत चक्क दारुपार्टी ! असली शिवसेनेच्या ‘शाखा’ न्यायमंदिर, गद्दार गटाच्या शाखा ‘दारूचे बार’!’

Liquor Party at Shiv Sena's Chembur Office:

व्हायरल व्हिडिओमध्ये चेंबूरमधील शिवसेना कार्यालयात अनेक व्यक्ती दारू पिताना दिसत आहेत. पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांसारख्या प्रमुख व्यक्तींचे पोस्टर लावलेले दिसत आहे, यामुळे वाद आणखी वाढला. व्हिडिओमध्ये टेबलावर दारूच्या बाटल्या आणि भरलेले ग्लास ठेवलेले दिसत आहेत. मात्र, लेटेस्टली मराठीने स्वतंत्रपणे व्हिडिओची सत्यता पडताळलेली नाही. (हेही वाचा: Raksha Khadse Daughter Harassment Case: 'खडसेंच्या नातीला छेडणारे एका विशिष्ट पक्षाचे आहेत'; रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया)

या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, शिवसेना (यूबीटी) नेत्यांनी सत्ताधारी गटावर तीव्र हल्ला चढवला. सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर टीका केली आणि त्यांच्यावर पक्षाच्या वारशाचा अनादर केल्याचा आरोप केला. त्यांनी म्हटले की अशा घटनांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होते. महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही घटना खरोखरच घडली असेल तर, ती दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. झी 24तासने दिलेल्या वृत्तानुसार, पक्ष कार्यालयांचा गैरवापर होत असेल तर योग्य ती कारवाई केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

(ही बातमी माध्यमांच्या अहवालांवर आधारीत आहे, लेटेस्टली मराठी या व्हिडीओची पुष्टी करत नाही.)