CM Devendra Fadnavis | फोटो सौजन्य -ANI

Khadse Daughter Harassment Case: केंद्रीय मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या मुलीचे छेडछाड प्रकरण सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहे. या प्रकरणी जळगावातील मुक्ताई नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असून हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, 'खडसेंच्या नातीला छेडणारे एका विशिष्ट पक्षाचे आहेत हे खूपचं दुर्दैवी आहे. या प्रकरणात पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे. इतर काहींनाही अटक केली जाईल. त्यांनी अशा सार्वजनिक ठिकाणी जे काही केले, पीडितांना त्रास दिला ते चुकीचे आहे. अशा लोकांना माफ केले जाऊ शकत नाही. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.'

काय आहे प्रकरण?

जळगावमधील एका यात्रेदरम्यान रक्षा खडसे यांची मुलगी आणि तिच्यासोबत असणाऱ्या इतर मुलींचा काही टवाळखोर तरुणांनी विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून मुक्ताई नगर पोलिस ठाण्यात चार तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणांना तातडीने अटक करण्याची मागणी रक्षा खडसे यांनी केली आहे. (हेही वाचा -Raksha Khadse’s Daughter Harassed: रक्षा खडसे यांच्या मुलीची यात्रेदरम्यान छेडछाड; आरोपींवर कडक कारवाईची केली मागणी)

माध्यमांना या प्रकरणाची माहिती देताना रक्षा खडसे यांनी सांगितले की, या तरुणांनी त्यांच्या मुलीसोबत असलेल्या सुरक्षा रक्षकाला कॉलर धरून धमकावले. तसेच आरोपींनी माझ्या मुलीचे फोटो काढले आणि तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. प्राप्त माहितीनुसार, या तरुणांमध्ये काही गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेले तरुण देखील सामील असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुलींची छेडछाड करणाऱ्यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी रक्षा खडसे यांनी केली आहे. रक्षा खडसे यांनी स्वत: पोलिस स्टेशनमध्ये जाऊन घडलेल्या सर्व प्रकाराची तक्रार नोंदवली आहे. दरम्यान, रक्षा खडसे यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असून कडक कारवाईची मागणी करणार असल्याचं सांगितलं आहे.

डेप्युटी एसपी कुशनत पिंगडे यांनी सांगितले की, 28 फेब्रुवारी 2025 रोजी कोथळी गावात यात्रेसाठी गेलेल्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलीसह दोन ते तीन मुलींचा काही तरुणांनी पाठलाग केला आणि काही कमेंट्स केल्या. या प्रकरणात, विनयभंग, पोक्सो आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापि, एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सुरक्षा कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत 7 तरुणांचा समावेश होता.