नाशिक, उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी; पुढच्या आठवड्यात राज्यात मान्सून दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज
Rainfall (Image used for representational purpose only) (Photo Credits: PTI)

नाशिक (Nashik) आणि उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) काही ठिकाणी आज (शनिवार, 8 जुन 2016) हलक्या ते मध्यम पावसाच्या (Rain) सरी कोसळल्या आहेत. अचाकन आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडवली. पण, असे असले तरी उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला मात्र चांगलाच दिलासा मिळाला. उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाचे चटके बसत आहेत. पाणी टंचाई, दुष्काळ, जनावरांचा चारा टंचाई अशा अनेक समस्यांनी ग्रामीण भागातील जनता हैराण आहे. त्यामुळे ही दुष्काळग्रस्त जनता आकाशाकडे डोळे लाऊन आहे. आजच्या पावसाने या जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, केरळ किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन झाले आहे. पुढच्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. दरम्यान, यंदाचा मान्सून हा दक्षणेपासून उत्तरेकडे सरकायला साधारण पाच ते सात दिवसांचा विलंब लागेन. जूनमध्ये यंदा देशभारत सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल असेही सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या मागे लागलेले दुष्काळाचे शुक्लकाष्ट कसे संपणार हा प्रश्न उपस्थित होतो आहे. (हेही वाचा, सुखवार्ता! अखेर मान्सून केरळात दाखल; लवकरच महाराष्ट्रातही धडकणार)

कसा असतो मान्सूनचा प्रवास?

सर्वात आधी मान्सून कोरळच्या किनारपट्टीवरुन भारतात दाखल होतो. त्यानंतर हळूहळू तो देशभर प्रवास करतो. आजवरचा इतिहास पाहता मान्सून जेव्हा केरळमध्ये दाखल होतो तेव्हा तिथून पुढे साधारण आठवडाभरामध्ये महाराष्ट्रात दाखल होतो. आतापर्यंत सर्वसाधारणपणे मान्सून हा 1 जुन रोजी केरळमध्ये दाखल होतो असे मानले जात असे. गेली अनेक वर्षे त्यात थोड्याफार फरकाने सातत्याही होते. मात्र, अलिकडील काही वर्षांमध्ये निसर्गात होत असलेले बदल पाहता निसर्गचक्रच बदलताना पाहायला मिळते आहे. त्यामुळे केरळमध्येही मान्सूनचे अनेकदा आगमन उशीरा होते.