
राज्यात लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) राबविल्याने महायुतीची सत्ता पुन्हा एकदा आली असं संगितलं जातं. पण, या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार वाढला आहे. योजना सुरु झाली तेव्हाच त्याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते. ही योजना राज्य सरकारसाठी आतबट्ट्याची ठरते आहे, हे आता सर्वांच्याच लक्षात आले आहे. अर्थमंत्री अजित पवार () यांनी याच योजनेवरुन बोलताना थेट सरकारची आतली बाजूच सांगिली. निवडणुकीदरम्यान, सरकारने नेमका काय विचार केला, याबाबत त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत सांगून टाकले.
'..तर आमचं सरकारच आलं नसतं'
लाडकी बहीण योजना राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार टाकत आहे. खरं म्हणजे हे त्या वेळीही आमच्या लक्षात आले होते. मात्र, मी त्या वेळी हे सत्य सांगितलं असतं तर आमचं सरकारच आलं नसतं, असं अजित पवार यांनी धक्कादायकरित्या म्हटल आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात मुलाखतीदरम्यान बोलताना अजित पवार यांना विचारण्यात आले की, ही योजना राज्याच्या आर्थिक दृष्टीकोणातून तिजोरीवरील ताण वाढवणारी ठरु शकते, हे तुम्ही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून दिली नव्हती काय? यावर बोलताना अजित पवार म्हणाले, हे माझ्या लक्षात आलं होतं. पण, आम्ही मी जर त्या वेळी खरं सांगितलं असतं तर आमचं सरकारच आलं नसतं. शेवटी आम्हीही काही साधू-संत नाही आहोत. आमचीही काही गणितं असतात. केंद्र सरकारकडून निधी घेऊन राज्याचे उत्पन्न वाढवून वाढलेला आर्थिक ताण कमी करता येऊ शकेल, असे तेव्हा आम्हाला वाटलं होतं, असेही त्यांनी प्रांजळपणे म्हटलं. (हेही वाचा, Ladki Bahin Yojana: पैसे मिळूनही लाडकी बहीण ठरणार अपात्र! अजित पवार यांनी स्पष्टच सांगितले)
भटकती आत्मा म्हणने विरोधात गेले
विधासभा निवडणूक प्रचारात शरद पवार यांना भटकती आत्मा म्हटलं गेलं. शरद पवार हे राजकारणात मुरलेले आहेत. त्यामुळे त्यांनी त्याचा फायदा घेत मला भटकती आत्मा म्हटलं गेलं. होय, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी भटकती आत्मा आहे, असं सांगायला त्यांनी सुरुवात केली. ते विधान आमच्या विरोधात गेलं. त्यामुळे आम्ही आणखी आरोप-प्रत्यारोप न करता थेट केलेली विकासकामेच सांगण्यास सुरुवात केली. ज्याचा आम्हाला फायदा झाला, असेही अजित पवार म्हणाले. (हेही वाचा, Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना सुरु राहणार की बंद होणार? अजित पवार यांची सभागृहात माहिती)
दरम्यान, लाडकी बहीण योजनेवरुन राज्य सरकारमध्येही खदखद पाहायला मिळत आहे. सरकारमधील मंत्री संजय शिरसाट यांनीही या योजनेवरुन अलिकडेच तीव्र नाराजी व्यक्त केली होती. दुसऱ्या बाजूला सरकारच्या विविध विभागांतर्फेर राबविल्या जाणाऱ्या योजनांनाही या योजनेने कात्री लावली आहे.