Kunal Kamra (Photo Credit X)

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) याने शनिवारी (5 एप्रिल) मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल केली आहे. याद्वारे त्याने त्याच्याविरुद्ध दाखल केलेके एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. एका कॉमेडी शो दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध केलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल, त्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. आता कामराच्या या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने सांगितले की, ते तातडीने सुनावणी घेतील, परंतु जर कामराला अटकेपासून दिलासा हवा असेल तर त्याला योग्य खंडपीठाकडे जावे लागेल.

उच्च न्यायालयाच्या वेबसाइटनुसार, कामराने 5 एप्रिल रोजी एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की या कारवाईमुळे संविधानाच्या कलम 19(1)(अ) (भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार), 19(1)(ग) (कोणताही व्यवसाय करण्याचा अधिकार) आणि 21 (जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार) अंतर्गत हमी दिलेल्या त्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले आहे. मुंबई पोलिसांनी कामराला तिसऱ्यांदा समन्स बजावले होते, परंतु तो शनिवारीही हजर झाला नाही.

Kunal Kamra Row: 

याआधी 24 मार्च रोजी, शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीवरून, एमआयडीसी पोलीस ठाण्याने कामराविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. नंतर हा शून्य एफआयआर खार पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आला. तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की, कामराने खार येथील हॅबिटॅट स्टुडिओमध्ये एका कार्यक्रमादरम्यान एकनाथ शिंदे यांच्या नैतिक प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे अपमानजनक विधान केले होते , ज्यामुळे केवळ शिंदे यांची प्रतिमाच खराब झाली नाही, तर राजकीय पक्षांमधील शत्रुत्वही वाढले. (हेही वाचा: Marathi Language Row: राज ठाकरे यांचे मनसे कार्यकर्त्यांना पत्र; मराठी भाषेसाठी चालवले जाणारे आंदोलन थांबवण्याचे केले आवाहन)

यापूर्वी, मद्रास उच्च न्यायालयाने मुंबईत दाखल झालेल्या याच प्रकरणात कामराला 7 एप्रिलपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. कामरा याने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि म्हटले होते की, तो तामिळनाडूमधील कायमचा रहिवासी आहे आणि त्याच्या महाराष्ट्राच्या भेटीदरम्यान त्याला अटक किंवा शारीरिक इजा होण्याचा धोका आहे. त्याने न्यायालयात असा युक्तिवादही केला की, त्याच्याविरुद्धची तक्रार राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे आणि व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर झालेली तोडफोड हा एफआयआर दुर्भावनापूर्ण हेतूने दाखल करण्यात आल्याचा पुरावा आहे.