Stand-Up Comedian Kunal Kamra and Maharashtra Deputy CM Eknath Shinde (Photo Credits: X/@kunalkamra88)

कॉमेडियन कुणाल कामराने (Kunal Kamra)  'Naya Bharat' या त्याच्या युट्युब चॅनेलवर एक खास विनोदी कार्यक्रमाचा व्हिडिओ अपलोड केला आहे. शिवसैनिकांनी या व्हिडिओ वर आक्षेप घेत राडा घातला आहे. 'गद्दार' या शब्दावरून भडकलेल्या शिवसैनिकांनी रविवार (23 मार्च) रात्री जेथे व्हिडिओ शूट झाला त्या खार स्थित स्टुडिओची तोडफोड केली आहे. दरम्यान कुणालने प्रत्यक्ष एकनाथ शिंदे यांचे नाव घेतलेले नाही पण शिवसैनिक आक्रमक झाल्याने आता त्यांच्याकडून कुणाल कामराने माफी मागावी अशी मागणी समोर आली आहे.

कुणाल कामरा माफी मागणार?

कुणाल कामरा सध्या मुंबई बाहेर असल्याची माहिती काही मीडीया रिपोर्ट्स मधून समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीच्या आधारे, कुणाल कामराशी मुंबई पोलिसांनी फोनवरून संपर्क साधला आहे. यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना 'गद्दर' किंवा देशद्रोही असे संबोधल्याबद्दल त्यांना 'खेद' वाटत नाही, असे कुणाल कामराने मुंबई पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान माफी मागण्याचा प्रश्न आला तर ती मागण्यास मला कोर्ट सांगत असल्यास ती माफी मागितली जाईल असे कुणालने सांगितल्याचे NDTV ने वृत्तात सांगितले आहे.

शिवसेनेकडून अल्टिमेटम

संजय निरूपम यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये "सध्या कामरा विरुद्ध MIDC पोलिस ठाण्यात FIR दाखल करण्यात आला आहे. परंतु जर त्यांनी माफी मागितली नाही तर कायदा त्यांच्या पद्धतीने काम करेल आणि आम्ही आमचे काम आमच्या पद्धतीने करू. या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण त्याचा गैरवापर होऊ नये. कुणाल कामराने त्याचा गैरवापर केला आहे. त्यांनी अपशब्द वापरले आहेत. हे विनोद नाही, उथळपणा आहे. अशा उथळ लोकांना शिवसेना स्टाईल मध्ये धडा शिकवला जाईल."

कुणाल कामराने का मागावी माफी? आदित्य ठाकरेंचा सवाल

उद्धव ठाकरे गटाकडून कुणाल कामरा यांचे समर्थन केले जात आहे. 'कुणाल ने एकनाथ शिंदे यांचे थेट नाव घेतलेले नाही मग त्यांच्या नाकाला मिर्ची का झोंबत आहे? कुणाल कामरा ने का मागावी त्यांची माफी?' असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारचा आहे.