Kunal Kamra (Photo Credit X)

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरुद्ध टिप्पणी केल्यानंतर, स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) याच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता खार पोलिसांनी कामराविरुद्ध तीन गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी एक गुन्हा जळगाव शहराच्या महापौरांच्या तक्रारीच्या आधारे नोंदवण्यात आला आहे, तर दोन गुन्हे नाशिकमधील हॉटेल व्यावसायिक आणि अजून एका व्यावसायिकाच्या तक्रारीच्या आधारे नोंदवण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध टिप्पणी केल्यानंतर पोलिसांनी कुणाल कामराला तीन वेळा समन्स पाठवले आहे. तिसऱ्या समन्समध्ये, पोलिसांनी कामराला 31 मार्च रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. गेल्या दोन समन्समध्ये, कामरा त्याची बाजू मांडण्यासाठी पोलिसांसमोर हजर झाला नव्हता.

विनोदी कलाकार कुणाल कामराने शुक्रवारी मद्रास उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. अटकपूर्व जामिनाच्या अर्जात, कामराने असा युक्तिवाद केला की, तो तामिळनाडूच्या वल्लुपुरम जिल्ह्यातील आहे आणि त्याला मुंबई पोलिसांकडून अटक होण्याची भीती आहे. त्यानंतर कामराविरुद्ध दाखल झालेल्या अनेक एफआयआर संदर्भात न्यायालयाने त्याला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती सुंदर मोहन यांनी 7 एप्रिलपर्यंत अटींसह अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्याचे आदेश दिले.

दुसरीकडे, कुणालविरुद्ध आणखी तीन गुन्हे झाल्यानंतर, शनिवारी शिवसेनेचे (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी कुणाल कामराला विशेष संरक्षण देण्याची मागणी केली. संजय राऊत म्हणाले की, मी कामराला पोलिसांसमोर त्याची बाजू मांडण्याचा सल्ला दिला. परंतु ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या खासदार कंगना राणौत यांना शिवसेनेशी असलेल्या ‘विवादानंतर’ संरक्षण देण्यात आले होते, त्याचप्रमाणे कामरालाही तेच संरक्षण देण्यात यावे. (हेही वाचा: Kunal Kamra Anticipatory Bail: कुणाल कामरा यास मद्रास हायकोर्टाकडून अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर)

संजय राऊत यांनी केली विशेष संरक्षण देण्याची मागणी -

राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कुणाल कामरा दहशतवादी नाही, तो एक लेखक आणि कलाकार आहे. महाराष्ट्र सरकारने कुणाल कामराला विशेष संरक्षण द्यावे अशी माझी मागणी आहे. कंगना राणौतचे आमच्याशी मतभेद झाले तेव्हा तिलाही तिच्या सुरक्षेसाठी विशेष फोर्स पुरवण्यात आले होते. कामराने एकनाथ शिंदे यांना उद्देशून सादर केलेल्या गाण्यात ‘गद्दार’ हा शब्द वापरला होता, त्यानंतर वाद निर्माण झाला. अनेक राजकीय नेत्यांनी या वक्तव्याचा निषेध केला आणि त्याच्यावर कारवाईची मागणी केली.