क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार (Kranti Singh Nana Patil Social Award) यंदा डाव्या चळवळीतील ज्येष्ठ नेत्या वृंदा करात यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार क्रांतिसिंह नाना पाटील (Kranti Singh Nana Patil) लोकविद्यापीठाच्या (Krantisinh Nana Patil Lok Vidyapeeth) वतीने दिला जातो. वृंदा करात या मूळच्या पश्चिम बंगालमधील आहेत. विद्यार्थीदशेपासूनच त्यांचा सळवळींमध्ये सक्रीय सहभाग राहिला आहे. डाव्या चळवळींचा प्रमुख स्त्रोत राहिलेल्या एस.एफ.आय. या लढवू संघटनेद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवत आल्या आहेत.त्यांनी दिल्ली येथील मजुरांच्या हक्कासाठी कामगार संघटनेच्या माध्यमातून केलेले काम विशेष लक्ष्यनीय ठरले आहे.
वृंदा करात यांचा डाव्या चळवळींमध्ये सक्रीय सहभाग राहिला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने त्या 2005 मध्ये पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर खासदारही होत्या. त्यानंतर अल्पावधीतच त्यांची निवड मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलीट ब्युरोवरही झाली. अलिकडेच दिल्ली येथे झहांगीरपुरी येथे सामान्य लोकांच्या घरांवर बुलडोजर चालवला गेला. या वेळी वृंदा करात यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन सामान्यांना दिलासा मिळवून दिला. त्याही वेळी त्यांची देशभरात चर्चा झाली होती.
सामान्य नागरिकांप्रती असलेली बांधीलकी आणि योगदान या सर्वांचा विचार करुन क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कारासाठी व्यक्तिमत्वाची निवड केली जाते. येत्या 6 ऑगस्ट रोजी विटा येथे क्रांतिसिंह नाना पाटील सभागृहात वृंदा करात यांना प्राचार्य विश्वास सायनाकर यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल. प्रा. डॉ. तारा भवाळकर यांचे अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे. मानपत्र , सन्मानचिन्ह , शाल , श्रीफल आणि 21 हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप असणार आहे. क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठचे संघटक ॲड . सुभाष पाटील संघटक , अध्यक्ष भाई सुभाष पवार आणि सचिव ॲड . नानासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली.