
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भलेही सत्तासमिकरण जुळले असेल. त्यांच्यात वरवर पाहता तरी सर्व काही अलबेल असल्याचे दिसत असले तरी त्यांच्या समर्थकांमध्ये मात्र सर्व सुरळीत सुरु आहे असे मुळीच नाही. कधी भाजप शिवसेना (शिंदे गट) कधी राष्ट्रवादी आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात संघर्ष उफाळून येताना दिसतो आहे. कोल्हापूरमध्येही याचीच प्रचिती अनेकांना येते आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अजित पवार गटातील मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) विरुद्ध शिवसेना खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्यात जोरदार सामना रंगताना दिसतो आहे.
कोल्हापूरातील शिवसेना जिल्हाध्यक्ष आणि खासदार संजय मंडलिक गटाचे राजेखान जमादार यांनी आरोप केला आहे की, मंत्री हसन मुश्रीफ यांनी खासदार संजय मंडलिक यांचे काम अडवले आहे. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे. आरोप प्रत्यारोपावरुन जिल्हाधिकारी कार्यालयात मंडलिक विरुद्ध मुश्रीफ गटात चांगलाच सामना रंगल्याचे समजते. दोन्ही गटांतील नेत्यांची परस्परांसोबत आणि तेही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी जोरदार चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. पीडब्ल्युडी विभागातील अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार करतानाच अधिकाऱ्यांना हाताशी धरुन मंडलिक गटाची कामे अडविण्याचे काम सुरु असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार यांनी आक्रमक होत पीडब्ल्युडी अधिकाऱ्याला कॅमेऱ्यासमोर आणत काम नेमकं कोणी अडवले आहे ते सांगावे अशी मागणी केली. जून महिन्यात टेंडर निघूनही अद्याप वर्क ऑर्डर निघाली नाही. हे सर्व केवळ कंत्राटदारांच्या सांगण्यावरुनच सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला. कामं निट करा अन्यथा पीडब्ल्यूडीला xxx करु असा सज्जड इशाराच त्यांनी दिला आहे. दरम्यान, अजित पवार गट सत्तेत आल्याने मोठी अडचण झाल्याचेही ते म्हणाले.